डॉ. आनंदीबाई गौरव पुरस्काराने संस्था, स्वयंसेविका, अधिकारी-कर्मचारी सन्मानित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज पाटील
जनतेची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा आहे. त्यामुळे चांगल्या रितीने जनतेची सेवा करावी. निश्चितच परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार 2018-19, गोवर-रूबेला मोहीम यशस्वी केल्याबद्दल सत्कार आणि जागतिक लोकसंख्या दिन कामगिरीच्या आधारे बक्षीस योजनेंतर्गत संस्था, एन.जी.ओ. अधिकारी, कर्मचारी सर्जन, आशा स्वयंसेविका यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात आज झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपाध्यक्ष सतीश पाटील, आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील, समाज कल्याण समिती सभापती स्वाती सासने, आरोग्य समिती सदस्या रेश्मा राहुल देसाई, सुनीता रेडेकर, पुष्पा आळतेकर तसेच जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी राहुल देसाई, चेतन पाटील यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी बोलतांना अध्यक्षपाटील यांनी पुरस्कार विजेत्या आरोग्य संस्थाचे, तसेच सत्कार करण्यात येणा़-या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. जनसेवा ही ईश्वर सेवा असून चांगल्या कामाचे कौतुक सर्वत्र होते. तसेच महिलांनी आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, तसेच आहार, चांगल्या सवयी व वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे ही ते म्हणाले.

मित्तल म्हणाले, आयुष्यमान भारत योजनेव्दारे सर्वांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. तसेच कुठलेही काम करीत असताना सकारात्मक अपेक्षा ठेवल्यास कोणतेही काम चांगले होते. सर्व पुरस्कार प्राप्त संस्थांचे अभिनंदन केले. आरोग्य व बांधकाम समिती सभापती श्री. पाटील म्हणाले, सर्वांनी मनापासून व कर्तव्य भावनेने काम केल्यास काम उत्तम होते. पूर परस्थितीमध्ये सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालून काम केले सर्वांचे अभिनंदन. उपाध्यक्ष श्री. पाटील यांनी गोर- गरीब लोकांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, सर्व गरोदर माता, स्तनदा माता, बालक यांचे डिजीटल रेकॉर्ड प्रसुती रुग्णालयात उपलब्ध असते. बालकांच्या वाढीसाठी आवश्यक घटक मातेच्या दुधात असल्यामुळे स्तनपान महत्वाचे आहे. हे निर्सगाचे स्वीच ओवर मेकॅनिझम आहे.डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार विजेत्या सेवा रुग्णालय कसबा बावडाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी लोकांना उत्तम सेवा दिल्या तर परिस्थितीत नक्कीच बदल होवून आरोग्य संस्था बदल विश्वास वाढीस लागतो, पर्यायाने लोकसहभाग वाढत जातो, असे मनोगत व्यक्त केले.

डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार-उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लज आणि सेवा रूग्णालय कसबा बावडा विभागून प्रथम क्रमांक प्रत्येकी 25 हजार पुरस्कार रक्कम. प्राथमिक आरोग्य केंद्र भेडसगाव प्रथम क्रमांक 25 हजार रूपये. प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव व्दितीय क्रमांक 15 हजार रूपये. प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडळे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर विभागून तृतीय प्रत्येकी 5 हजार रूपये. आरोग्य उपकेंद्र नेर्ली प्रथम क्रमांक 15 हजार रूपये. आरोग्य उपकेंद्र कोनोली व्दितीय क्रमांक 10 हजार रूपये. आरोग्य उपकेंद्र ऐनापूर आणि आरोग्य उपकेंद्र वाठार तर्फ वडगाव विभागून तृतीय प्रत्येकी 2 हजार 500 रूपये.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सविता कुंभार यांनी केले तर आभार डॉ. फारुख देसाई यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्स भाऊसाहेब केम्पीपाटील, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. खैरनार, डॉ. उषादेवी कुंभार, डॉ. हर्षला वेदक, डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ. मोरे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सत्कार प्राप्त वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, सरपंच मोठया संख्येने उपस्थित होते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment