अहेरीत भाजपकडून पुन्हा अंबरीश आत्रामच; ग्रामसभेचा उमेदवार निर्णायक भूमिका बजावणार

गडचिरोली प्रतिनिधी। भाजपाच्या पहिल्याच उमेदवार यादीत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी दोन्ही विद्यमान आमदारांना जाहिर करण्यात आली होती. मात्र अहेरी विधानसभा क्षेत्राचा या यादीत समावेश नव्हता. यामुळे अहिरीचे विद्यमान आमदार राजे अम्ब्रीश आत्राम यांचा पत्ता कट होणार की काय अशी अशी शंका आत्राम समर्थकांना वाटत होती. शेवटी भाजपाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत अम्ब्रीश आत्राम यांचे नाव जाहिर केले असल्याने आता या विधानसभा क्षेत्रातील सस्पेंस संपला आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रातून विद्यमान आमदार अम्ब्रीश आत्राम, त्यांचे काका माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम सोबतच माजी आमदार दीपक आत्राम हे सुध्दा अहेरीतून भाजपाकडून तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नात होते. मागील ४ दिवसांपासून माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या नावाची जोरदार चर्चा मतदारसंघात रंगली होती.

त्यातच भाजपाने पहिल्या यादीत अहेरी विधानसभा क्षेत्रातून कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहिर न केल्यामुळे आणखी संभ्रम वाढला होता. त्यामुळे संपूर्ण जिल्हा वासियांचे अहेरी विधानसभा क्षेत्रातील घडामोडींकडे लक्ष लागले होते. मात्र भाजपाने अखेर अम्ब्रीश यांना तिकीट दिल्याने आता मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

You might also like