बाबरी मशीद विध्वंस प्रकरण: ३० सप्टेंबरला विशेष CBIकोर्टचा निकाल; आडवाणी, जोशी आणि इतर आरोपींना हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली । बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी येत्या ३० सप्टेंबरला लखनऊचे विशेष सीबीआय कोर्ट निकाल देणार आहे. न्यायाधीश एस.के.यादव यांनी निकालाच्या दिवशी लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशींसह एकूण ३२ आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने लखनऊच्या विशेष सीबीआय कोर्टाला ३० सप्टेंबरपर्यंत निकालासाठी मुदत वाढवून दिली होती.

आडवाणी-जोशींशिवाय विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि मशीद पाडणाऱ्या कार सेवकांविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आला होता.बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात एकूण ३२ आरोपी आहेत. यात माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपा नेते मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतुंभरा हे आरोपी आहेत. ६ डिसेंबर १९९२ रोजी कार सेवकांनी अयोध्येत मशीद पाडली होती. त्यावेळी लालकृष्ण आडवणी, मुरली मनोहर जोशी हे भाजपाचे वरिष्ठ नेते राम जन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करत होते.

“बचाव आणि अभियोग पक्षाचा युक्तीवाद १ सप्टेंबर रोजी संपला. त्यानंतर या खटल्याची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधीशांनी निकाल लिहायला सुरुवात केली. या प्रकरणात सीबीआयने न्यायालयासमोर ३५१ साक्षीदार आणि पुरावा म्हणून ६०० कागदपत्रे सादर केली” अशी माहिती सीबीआयचे वकिल ललित सिंह यांनी दिली.

एकदा या प्रकरणात आडवणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टासमोर हजर झाले व या प्रकरणात आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. राजकीय कारस्थानातंर्गत आडवाणी यांना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. त्यांच्याविरोधातील सर्व पुरावे चुकीचे आहेत असे आडवाणी यांचे वकिल के.के.मिश्रा यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like