व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

या ६ कार्यकर्त्यांनी हिरावला भाजप-सेना युतीचा महाजनादेश

विशेष प्रतिनिधी । साधारणतः लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी सेना-भाजपच्या वाटेवर जायला सुरुवात केली होती. आर्थिक घोळ केलेल्या नेत्यांना आपापल्या संस्था आणि जागा वाचवण्यासाठी हे पक्षांतर करावं लागल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यामध्ये प्रामुख्याने गणेश नाईक, जयदत्त क्षीरसागर, रश्मी बागल, मधुकर पिचड, वैभव पिचड, उदयनराजे भोसले, दिलीप सोपल, शेखर गोरे, गोपीचंद पडळकर, हर्षवर्धन पाटील, भाऊसाहेब कांबळे यांचा समावेश होता. यांच्या जाण्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी संपेल असंही म्हटलं जात होतं. परंतु राष्ट्रवादीच्या ५ जांबाज कार्यकर्त्यांनी अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्ठा करत युतीच्या तोंडातील महाजनादेशाचा घास हिरावून घेतला.

शरद पवार – “आम्ही कुस्तीसाठी तेल लावून तयार आहोत, पण समोर पैलवान कुठे आहे?” असं म्हणत विरोधकांना डिवचणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची निकालानंतर सर्वाधिक झोप कुणी उडवली असेल तर शरद पवारांनी. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अजून काही काळ आपल्याभोवतीच फिरेल हे शरद पवारांनी या निकालातून दाखवून दिलं. पक्षांतर केलेल्या नेत्यांना रोखण्याचा प्रयत्न पवारांनी केला नाही. जनताच त्यांना नाकारेल हा विश्वास बाळगत त्यांनी प्रचारात काँग्रेस-राष्ट्रवादीला कमी पडू दिलं नाही. ८० वर्षांचा तरुण, पायाला लागलं असताना फिरणारा नेता, विरोधकांशी एकटा लढणारा नेता, ईडीची झोप उडवणारा लढवय्या, विरोधकांच्या टीकेचं केंद्रबिंदू बनलेला नेता आणि सगळ्यात महत्त्वाचं पावसात भिजत लोकांना – युतीचं सरकार घालवा हे सांगणारा धुरंधर असा पवारांचा विधानसभा निवडणुकीतील शेवटच्या १५ दिवसांचा प्रवास होता. जनतेनेही पवारांच्या लढाऊ वृत्तीला दाद दिली आणि त्याचा परिणाम निकालात दिसून आला.

Untitled design (28)अमोल कोल्हे – अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे नवनियुक्त खासदार. आपल्या शिवराय आणि संभाजीच्या भूमिकांतून ते आधीच लोकांपर्यंत पोहचले होते. पण अभिनेता आणि लोकनेता यांच्यातील फरक त्यांना चांगलाच माहीत होता. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर स्टार प्रचारक म्हणून त्यांनी महाराष्ट्रात अक्षरशः झंझावात उभा केला. राज्यात ६० हून अधिक सभा घेत त्यांनी शरद पवारांना साथ देण्याचं भावनिक आवाहनही लोकांना केलं. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.

अमोल मिठकरी – आपल्या रांगड्या भाषणांनी यंदाची विधानसभा निवडणूक गाजवणारा हा राष्ट्रवादीचा तरुण कार्यकर्ता. भाजप-सेना कलम ३७०, अयोध्येचं राममंदिर हे मुद्दे उपस्थित करत असताना मिठकरी यांनी भाजपच्या राज्यातील चुकलेल्या धोरणांवर कडक ताशेरे ओढले. लोकांना समजेल अशा भाषेत सत्ताधाऱ्यांचा उपहास करण्याची एकही संधी अमोल मिठकरींनी सोडली नाही.

अजित पवार – भाजप सरकारने अनेक चौकशींच्या फेऱ्यात अडकवल्याने त्रस्त झालेल्या अजित पवारांनी राजकारण सोडावं वाटतंय असं म्हणत सुरेख राजकीय खेळी खेळली. माध्यमांचं लक्ष केंद्रित करुन जनतेची सहानुभूती मिळवण्यापर्यंत हा प्रवास गेला. त्याच कालावधीत शरद पवारांचं ईडी प्रकरण पण खूप गाजलं आणि तिथूनच विधानसभेचं वारं बदललं. या प्रकारानंतर मात्र अजित पवारांनी सभांचा सपाटा चालू केला. ठराविक मतदारसंघ डोळ्यांसमोर ठेवून मोजक्याच भाषेत आपली रणनीती लोकांपर्यंत पोहचवली. स्वतःच्या मतदारसंघात जराही लक्ष न देता त्यांनी मिळवलेलं दीड लाखांचं मताधिक्य त्यांची राजकारणावरील मांड स्पष्ट करतं. बाजूच्या मतदारसंघातील हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे यांचा त्यांनी चॅलेंज देऊन पराभव केला. एकूणच काय राजकारणातील ‘दादागिरी’ त्यांनी शेवटच्या टप्प्यात दाखवून दिली.

बाळासाहेब थोरात – लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेस संपली आहे, त्यांच्याकडे नेताच शिल्लक नाही, राहुल गांधी पक्षावर संकट आलं की विदेशात जातात, काँग्रेस पक्ष आता थकला आहे अशा सर्व टीकेनंतरही “मी पक्षासाठी बाजीप्रभूसारखी खिंड लढवेन” असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी महाराष्ट्रात ४० हून अधिक सभा घेतल्या. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी मोडीत काढत त्यांनी पक्ष एकसंध राहील आणि निवडणुकीत दगाफटका होणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळेच काँग्रेसला गतनिवडणुकीइतक्या जागा राखण्यात यश मिळालं.

धनंजय मुंडे – ८ खासदार, अमित शहा, स्मृती इराणी आणि नरेंद्र मोदी हे केंद्रातील दिग्गज नेते, राज्यातील २० विद्यमान आमदार या सगळ्यांनी धनंजय मुंडे यांना पराभूत करण्यासाठी कंबर कसली. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात तर आक्षेपार्ह विधान केल्याचं भावनिक राजकारणही पंकजा मुंडेंकडून खेळलं गेलं. पण तरीही धनंजय मुंडे आपल्या भाषणांतून स्वतःसोबत राष्ट्रवादीला अहमदनगरमध्ये लीड मिळवून देण्यात यशस्वी ठरले.

जर शिखर बँकेची चौकशी लागली नसती तर, पवारांचं नाव ईडी चौकशीत आहे ही गोष्ट बाहेर आली नसती तर, पंकजा मुंडेंनी त्या प्रकरणाचा बाऊ केला नसता तर, आणि प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेत पाऊस पडला नसता तर…

या सगळ्या गोष्टी जर तरच्या आहेत..आणि या जर..तर नेच राजकारणाची भाकरी फिरवली एवढं नक्की..!!