स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; ‘या’ आहेत प्रमुख तरतुदी

मुंबई । रस्ते अपघातांबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाची योजना आखली आहे. ‘स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजने’ला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीस आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल त्याचप्रमाणे विहित पद्धतीने विमा कंपन्यांची निवड करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या योजनेत अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला उपचारांची व आर्थिक मदतीची हमी मिळणार आहे.

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेसाठी १२५ कोटी रुपये लागणार आहेत. रस्त्यावर होणाऱ्या अपघातात तातडीने उपचार व्हावेत यासाठी ही योजना असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. या रस्ते अपघात विमा योजनेत ७४ पॅकेज असतील, अपघातानंतर मोफत उपचार मिळावेत, यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे. यासाठी राज्यातल्या अनेक रुग्णालयांचा समावेश केला जाईल. तसंच घरातील अपघात आणि रेल्वे अपघात यांचा या योजनेत समावेश नसेल, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा महाराष्ट्रातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातातील जखमींना लाभ मिळणार आहे. ही व्यक्ती केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर अन्य कोणत्याही राज्यातील वा देशातील असली तरीही त्यांना योजनेंतर्गत योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत. अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’ मध्ये तत्परतेने वैद्यकीय सेवा व आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेचा उपयोग होईल, असे नमूद करण्यात आले आहे.

आजमितीस राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांवर अपघातात दरवर्षी सरासरी ४० हजार व्यक्ती जखमी तर १३ हजार व्यक्ती मरण पावतात. अपघातानंतर वेळीच उपचार मिळाले तर जखमींचे प्राण वाचवणे शक्य झाले असते. ही बाब ध्यानात घेऊनच ठाकरे सरकारने दिवंगत बाळासाहेबांच्या नावाने ही नवीन योजना सुरू केली आहे. अपघातग्रस्तांसाठी ही योजना जीवनदायी ठरेल, असा सरकारला विश्वास आहे.

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेतील तरतुदी:
१) बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेत पहिल्या ७२ तासांसाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील.
२)सुमारे ७४ उपचार पद्धतीतून ३० हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाईल.
३)अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णालयाच्या वास्तव्यातील भोजन याचा समावेश यात असेल.
४)औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताचा यात समावेश नाही.
५)योजनेसंदर्भात कोणतीही तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक देखील असेल.
६)राज्य आरोग्य हमी सोसायटी (वरळी) यांच्यामार्फत ही योजना कार्यान्वित होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like