अवनी…!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विचार तर कराल | अनिल माने

माणसं खाती म्हणुन अवनी वाघिणीला रात्री गोळ्या घालुन मारलं. दोन वर्षात १३ लोकांना खाल्ल्याचा तिच्यावर आरोप होता. परिसरातल्या २५ गावांत तिची दहशत होती. ज्या घरांतील लोक शिकार झाले होते किंवा जे वाघिणीच्या दहशतीत जगत होते त्या लोकांनी सकाळी सकाळी फटाके वाजवुन वाघीण ठार झाल्याचा आनंद साजरा केला. सोशल मिडीयावर वाघिणीसाठीही हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरातील चुन्याच्या खाणींवर डल्ला मारता यावा म्हणुन हे घडवुन आणल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

बघायला गेलं तर वाघीण होती ती ! वाघिणीसारखीच जगली ! तिला मारण्यासाठी मध्यप्रदेशातुन चार हत्ती आणावे लागले. ५ शार्पशुटर, ३ मोठे पिंजरे, २०० वन कर्मचाऱ्यांची टीम असा सगळा लवाजमा उभा करावा लागला. पण वाघीण शेवटपर्यंत हातात आली नाही. शेवटी तिला गोळ्या घालुन मारावं लागलं. वाघीण होती म्हणुन तिची दहशत होती. कोंबडी किंवा बोकड असती तर लोकांनी तिलाच मसाला लावुन खाल्लं असतं !

वाघ वाचवायची मोहीम राबवणाऱ्या देशात वाघाची हत्या हा चर्चेचा विषय आहे. तिने माणसं मारली याविषयी दुःख आहेच, पण त्याबद्दल तिला आपल्याकडच्या कोणत्या न्यायालयात शिक्षेची तरतुद नाही ना ! नाहीतर तिलाही तिचा जबाब देता आला असता ! बिचारी जन्मठेप लागुन जेलमध्ये तरी गेली असती, सक्तमजुरी करुन जगली असती. तिचे बछडे अधुनमधुन तिला भेटायला आले असते. शिक्षा भोगुन पुन्हा जंगलात गेली असती. पण आता जंगलं तरी कुठं राहिल्यात. जंगलांवर माणसांचं अतिक्रमण झालं म्हणुन जंगलातील प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला आणि हे प्राणी मनुष्यवस्तीकडे वळले. एक वाघीण मारली म्हणुन दहशत संपते काय ?

हजारो लोकांचा जीव घेणाऱ्या माणसांना फाशीची शिक्षा होऊनही ते वर्षानुवर्षे जगत राहतात. काय करणार ? कायदेच माणसांचे आहेत. माणसांच्या सोयीचे आहेत. त्यांनाही गोळ्या घालुन संपविण्याची शिक्षा असती तर दहशत पसरवणारे शांततेच्या मार्गाने जगले असते…

fb_img_1541231701064-1106749613.jpg

अनिल माने

9096207033

Leave a Comment