हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेतकरी, शिक्षक आणि शास्त्रज्ञ हे देशाचा कणा असलेले लोक आहेत असं मानलं जातं. नवीन प्रकारच्या कल्पना सुचण्याचं, अंमलात आणण्याचं आणि त्या प्रत्यक्षात राबवण्याचं काम वर उल्लेख केलेले तीन समाजघटक करत असतात. मात्र या समाज घटकांवरच उपासमारीची वेळ काही लोकांकडून येत असेल तर?
अशाच काही कारणामुळे संतापलेल्या शिक्षकांनी आणि त्यांच्या हितचिंतकांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढले आहेत. साताऱ्यातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय आणि नागठाणे येथील आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज या ठिकाणी तासिका तत्वावर काम करणाऱ्या काही शिक्षकांचा पगार देण्याच्या बाबतीत संस्थेने दिरंगाई केली आहे. वर्षभराचे पगार शिक्षकांना भीक मागितल्यासारखे मागायला लावण्याचा प्रकार मे महिन्यात समोर आलेला असताना संस्थेने तात्काळ सूत्र हलवत काही शिक्षकांचे पगार तात्काळ केले. मात्र या कॉलेजमधील काही शिक्षकांच्या पगाराची अजूनही बोंब असल्याचं समोर आलं आहे. राजकीय धुमश्चक्रीत धुणी धुण्याचा प्रकार मागील २-३ दिवस चर्चेत असताना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील शिक्षकांची धुणी धुण्याकडेही लक्ष द्या अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ट्विटद्वारे करण्यात आली आहे.
संस्थेने ऑर्डर काढली नाही, ऑनलाईन पाठवलेली कागदपत्रे गहाळ झाली आहेत, वरिष्ठ लोकांशी बोलावं लागेल अशा प्रकारची उडवा-उडवीची उत्तरं कॉलेज प्रशासनाकडून दिली जात असून शिक्षकांना मात्र या बाबतीत तीव्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिक्षणसंस्थेत प्रचंड भ्रष्टाचार असल्याची कुणकुणही शिक्षकांना लागली असून वरिष्ठ प्रशासनाविरोधात आवाज उठवण्याचं धाडस शिक्षकांकडून केलं जात नाही. तासिका तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना रोजाने काम करणाऱ्या मजुरांपेक्षाही हलाखीचं जगणं जगायची वेळ आली आहे. प्राचार्यांना याचा जाब विचारला तर मुजोरी दाखवत शिक्षकांना कामावरुन कमी करण्याचा प्रकारही या संस्थेत घडला आहे. अशी मनमानी करुन निवृत्त होईपर्यंत प्राचार्यपदाची खुर्ची सोडायची नाही असा चंग बांधणाऱ्या प्राचार्यांना जाब कोण विचारणार? संस्थेच्या संचालकांचं आणि इतर सदस्यांचं या गोष्टीकडे लक्ष कधी जाणार? हा प्रश्न आता शिक्षक लोकांसोबत सामान्य नागरिकांनाही पडला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’