केवळ १६ मिनिटांत एटीएम फोडून १३ लाख लांबवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | नाशिकच्या जेल रोड शिवाजीनगर येथील स्टेट बॅँक ऑफ इंडिया एटीएम केंद्रातील मशीन अवघ्या १६ मिनिटांत गॅस कटरने फोडून चोरट्यांनी सुमारे १३ लाखांची रोकड चोरून नेली. चोरी केल्यानंतर इनोव्हा गाडीतून चोरटे पसार झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेल रोड येथील मंजुळा मंगल कार्यालया शेजारी असलेल्या मंजुळाबाई अपार्टमेंटच्या दर्शनी गाळ्यामध्ये स्टेट बॅँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. बुधवारी पहाटे ३ वाजून १ मिनिटांनी तोंडाला लाल रूमाल बांधलेला, डोक्यात राखाडी रंगाची टोपी, निळा शर्ट परिधान केलेला सडपातळ व ठेंगणा २८ ते ३० वर्षीय एक युवक सर्वात आधी एटीएम केंद्रात शिरला. चोरट्यांनी पहिल्यांदा एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर कापून टाकल्या. नंतर चोरट्यांनी गॅस कटर मशीनच्या साह्याने एटीएम मशीन (सी.एफ.बी.ए ००१४६९०९३) चा पुढील पत्रा कापून मशीन उघडले. त्या मशीनमध्ये चार ट्रेमध्ये ठेवलेली १३ लाख ३० हजार ५०० रुपयांची रोकड ट्रे सोबत घेऊन पोबारा केला.

मंजुळा मंगल कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे इनोव्हा गाडीतून पळून गेल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान चोरट्यांनी शिवाजीनगर येथील साईमूर्ती अपार्टमेंटमधील युनियन बॅँकेच्या एटीएम केंद्रातील दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायरी कापून टाकल्याचे उघडकीस आले आहे.

सकाळी सफाई कामगार सूरज ढकोलिया साफसफाई करण्यास आला असता त्याला एटीएम मशीन फोडलेले आढळले. बोडके यांनी इलेक्ट्रॉनिक पेमेंट अ‍ॅन्ड सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीचे मिलिंद काशीनाथ नेहे यांना माहिती देताच काही वेळातच घटनास्थळी पोलीस पोहचले.

पोलीस उपायुक्त विजय खरात, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त आर.आर. पाटील, ईश्वर वसावे, समीर शेख, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, दिनेश बर्डीकर, कुमार चौधरी, सुधीर डुंबरे आदींसह श्वान पथक, ठसे तज्ज्ञ, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

एटीएम मशीन फोडणारे चोरटे किती होते, कुठून आले, कसे गेले, इनोव्हा गाडीचा क्रमांक आदी माहिती शोधण्यासाठी परिसरातील, जेलरोड व टोल नाक्याजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. परंतु निश्चित धागेदोरे हाती न लागल्याने पोलीस शोध अजून घेत आहेत. याप्रकरणी मिलिंद नेहे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment