कोरोनामुळे आंबा महोत्सव पुन्हा एकदा येणार अडचणीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या संकल्पनेतून जाधववाडी येथे गेल्या चार वर्षापासून आयोजित केला जाणारा आंबा महोत्सव  यंदा कोरोनामुळे पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. गेल्या वर्षीही कोरोनाच्या कहरामुळे हा महोत्सव रद्द करावा लागला होता.  यंदा परिस्थिती सामान्य झाली की,  1 मेनंतर आयोजनासाठी प्रयत्न केले जातील,  अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा व ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न पणन मंडळामार्फत शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत ही योजना राबविली जाते.  आंब्याचा मोसम लक्षात घेत आंबा उत्पादक व ग्राहकांना एकाच छताखाली आणण्यासाठी पणन मंडळ व येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत चार वर्षापूर्वी जाधववाडी येथील बाजार समिती आवारात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

नैसर्गिकरित्या पिकविलेल्या केसर,  हापूससह अन्य आंब्याची चव यानिमित्ताने औरंगाबादकरांना वाजवी दरात चाखता आली होती.  ग्राहकांच्या प्रतिसादामुळे मराठवाड्यातील केसर उत्पादक शेतकऱ्यांसह कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या महोत्सवात दुसऱ्या वर्षीही सहभाग नोंदविला होता.

परिस्थिती सामान्य होण्याची प्रतीक्षा :
यंदा आंब्याचा हंगाम सुरु होताच बाजार समितीने महोत्सवाच्या आयोजनासाठी तयारी सुरु केली होती. एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात महोत्सव आयोजनाचे नियोजन होते, परंतु कोरोनाचा कहर वाढल्याने तूर्तास महोत्सव स्थगित केल्याशिवाय समितीसमोर पर्याय नाही.  परिस्थिती सामान्य झाल्यावर सर्व दक्षता घेत महोत्सव आयोजित करु,  असे नियोजित समितीने हाती घेतले आहे.

एप्रिल २०२० अखेर महोत्सवाचे आयोजनासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला होता, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महोत्सव रद्द करण्यात आला होता.  असे असतानाही कोकणातील काही शेतकऱ्यांनी हापूस विक्रीसाठी आणला होता.  त्यांना समितीने माल विक्रीसाठी तसेच राहण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली होती.  १५० हून अधिक हापूस आंब्याच्या पेट्याची विक्री त्यावेळी झाली होती.

आंबा महोत्सवास ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो हा अनुभव आहे.  त्यामुळेच शेतकऱ्यांकडूनही महोत्सवाबाबत विचारणा होते.  यंदा आयोजनाचा विचार असला तरी कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता तूर्तास जोपर्यंत परिस्थिती सर्वसामान्य होत नाही,  तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

Leave a Comment