चंद्रकांत पाटलांची निवडणुकी करिता कागदांची जुळवाजुळव सुरू ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘निवडणूक लढवा’ असा आदेश दिल्यानंतर धावपळ नको म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ती आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार असल्याने आणि राज्यभर प्रवास करावा लागणार असल्याने स्वत: पाटील निवडणूक लढविण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याचे समजत आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी लढावे, अशी तेथील भाजपा नेत्यांची इच्छा आहे. तर कोल्हापूर उत्तर आणि राधानगरी मतदारसंघातूनही त्यांच्या नावाची चर्चा आहे. या सर्व गोष्टी युती होणार की नाही, यावरच अवलंबून आहेत.

तरीही अमित शहा यांनी जर पाटील यांना निवडणूक लढविण्याची सूचना केली तर ती डावलणे शक्य होणार नाही. त्यामुळेच पाटील यांच्या निकटवर्तीयांनी उमेदवारीसाठी आवश्यक ना हरकत दाखले, गुन्हा नोंद नसल्याची पत्रे घेण्याचे काम जोरात सुरू केले आहे. दरम्यान राज्यातील सत्तारूढ शिवसेना – भाजपा युतीच्या जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. परिणामी दोन्ही पक्षाचे नेते एका बाजूला युती होणारच असल्याची ग्वाही देत असतानाच दुसऱ्या बाजूला दोघांनी ही स्वबळाची तयारी सुरूच ठेवली आहे. राज्य सरकारमधील दोन नंबरचे मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आता विधानसभा लढविण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

सध्या शिवसेनेकडे असलेला ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघ चंद्रकांतदादांच्या दृष्टीने अत्यंत सेफ समजला जात आहे. सध्या हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर या मतदारसंघाचे आमदार आहेत. तर आमदार क्षीरसागर यांनी यावेळी ‘आपणच हॅट्रिक करू’ असा विश्‍वास व्यक्त केला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment