नऊ दिवस नऊ देवी | प्रणव पाटील
जैन पंथा मधे पद्मावती ही एक देवी आहे. ही देवी पार्श्वनाथ या जैन तीर्थंकरांच्या समकालीन यक्क्षिणी असून या देवी ने जिन शासनात पुष्कळ सुधारणा केल्या म्हणून या देवीला शासनदेवी असेही म्हणतात.
तसेच पार्श्वनाथांचं रक्षण करणाऱ्या धरणेंद्र या यक्षाची पत्नी म्हणून ही या देवीचा उल्लेख येतो .
या देवीला सर्प आणि कोंबडा वाहन असून ती कमळावर बसलेल्या स्थितीत असते,तीला चार हात असून हातात कमळ,पाश,फळ आणि अंकूशधरलेल्या स्थितीत ती असते.बंगाल मधे हातात सर्प धरलेल्या मनसा देवीच्या नावानेही ती ओळखली जाते, या देवीचं वर्णन पारसनाथ चरित्र या ग्रंथात पुढील प्रमाणे आहे.
तथा पद्मावती देवी कुर्कुटोरगवाहना |
स्वर्णवर्णा पद्मपाशभृद्दक्षिणकरद्वया ||
फलांकुशधाराभ्यां च वामदोर्भ्याः वीराजिता ||
पुढे या देवीला तांत्रिकपंथात आणि शाक्त पंथातही स्थान मिळाले म्हणूनच भूत,प्रेत यावर उपचारां करिता तीचे अनेक तात्रिक मंत्र -तंत्र , कवच निघाले या उपासनेत तीच्या कवचाचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले –
राजद्वारे श्मशाने च भूतप्रेतोपचाके |
बन्धने च महादुःखे भयशत्रुसमागमे |
स्मरणात कवचं शास्यं भयं किन्चिन्न जायते ||
अशा प्रकारे साधी यक्षिणी असणारी पद्मावती पुढे देवी आणि नंतर तांत्रिक देवी कशी विकसित झाली आणि ही मूळ रुपा पासून कशी दूर होत गेली हे यातून समजते. गुंथर सोंथायमर नुसार पुण्यातील पद्मावती या ठिकाणी असृलेल्या मंदीरातील देवी ही मूळ पद्मावती जैन देवता आहे जी व्यापारी तांड्या बरोबर पुण्यात येऊन स्थापन झाली.
प्रणव पाटील
9850903005
(लेखक इतिहासाचे अभ्यासक असून आय.एल.एस महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत आहेत).
संदर्भ –
१)देवीकोष खंड ३
२) भारतीय संस्कृती कोष खंड ४