पती-पत्नीमधील संवादाची गरज दाखवून देणारा – पती, पत्नी और वो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । कानपूरमध्ये राहणारा अभिनव त्यागी (कार्तिक आर्यन), लखनऊची वेदिका त्रिपाठी (भूमी पेडणेकर) आणि दिल्लीची तपस्या सिंग (अनन्या पांडे) या तिघांमधील रिलेशनशीप केमिस्ट्रीची धमाल जुगलबंदी चित्रपटात पहायला मिळते. अभिनव आणि वेदीकाचं लग्न झालेलं असतं आणि एकंदरीत चांगलं चाललेलं असतं दोघांचं. वेदिकाची दिल्लीला राहण्यासाठी जाण्याची फार इच्छा असते आणि अभिनव ही गोष्ट तितकी मनावर घेत नसतो. सार्वजनिक बांधकाम खात्यात कामाला असणाऱ्या अभिनवला एके दिवशी दिल्लीची तपस्या भेटते. बायको असतानासुद्धा एखाद्या सुंदर मुलगीच आयुष्यात येणं एका नवऱ्याच्या मनात किती घालमेल करतं हे चित्रपट पाहिल्याशिवाय लक्षात येणार नाही. अपारशक्ती खुराणाने अभिनवच्या मित्राची भूमिका लाजवाब साकारली आहे. मित्राच्या चुका पोटात घालून त्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी धडपडणारा हा मित्रही तुम्हाला नक्कीच भावेल.

प्रत्येक मुलाच्या आयुष्यात आलेली पहिली मुलगी किंवा लग्नाआधी मुलीच्या आयुष्यात असणारा एखादा मुलगा हे दुर्मिळ प्राण्यासारखेच असतात. यांच्या आठवणी विसरता न येण्यासारख्या असतात आणि हे चित्रपटातील काही प्रसंगातून खुमासदार पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. चित्रपटातील राकेश यादव नावाचं पात्रही कमाल झालं आहे.

दिग्दर्शक म्हणून मुदसर अझीझ यांनी पूर्ण चित्रपटात मनोरंजकता टिकवून ठेवली आहे. चित्रपटात सहभागी प्रत्येक पात्राला पुरेपूर भूमिका करायला वाव मिळाला आहे. चित्रपटातील गाणी ही बहुतांशी रिमेक केलेली आहेत आणि ती चांगली झाली आहेत.

एकूण काय मनोरंजन करता करता हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नका, हा मौलिक संदेश देण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे. दैनंदिन कामाच्या धबडग्यातून रिलॅक्स व्हायचं असेल तर हा हलकफूलका चित्रपट पाहायला काहीच हरकत नाही.

Leave a Comment