पुणे : पुण्यातील पाषाण परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. पाषाण तलावाकडून महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जवळ असलेल्या कचरा कुंडीत जुळ्या अर्भकांना टाकून देण्यात आले. या घटनेनंतर एका अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चतुःशृंगी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये माहिती घेतली आणि या प्रकारचा छडा लागला. जननी नर्सिंग होम कर्वे नगर या ठिकाणी एका महिलेने जुळ्या अर्भकांना जन्म दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी अधिक तपास घेतला असता पोलिसांनी वडगाव बुद्रुक येथून संतोष वाघमारे (वय ३०) या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संतोष वाघमारे आणि एका महिलेचे प्रेमसंबंध होते. पाषाण रस्त्याजवळील कचरा कुंडीत टाकलेले अपत्य त्यांचेच असल्याचे आणि संतोषनेच ठेवल्याचे त्याने कबुल केले. या जुळ्या मुलांचा जन्म १३ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता झाला होता. १४ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजता या नवजात अर्भकांना कचराकुंडीत टाकण्यात आले. सदर महिलेला पहिल्या पतीपासून तीन मुली आहेत. या अपत्यांचा सांभाळ करता येणार नाही म्हणून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी संतोष वाघमारे याच्या विरुद्ध वार्जेमळेवाडी पोलीस स्थानकात भारतीय दंड विधान कलम ३०२ व ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सदर अपत्याचे पालक तेच असल्याचे निष्पन्न झाले आहे.या प्रकरणाच्या तपासात पोलीस नाईक प्रकाश आव्हाड, सचिन कांबळे, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मुळे, अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, शहर पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, पोलीस निरीक्षक माया देवरे यांनी महत्वाची भूमिका बजावली.