रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर हिंदूंनी मुस्लिम बांधवांना बांधली राखी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण प्रतिनिधी | मलंगगडावर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून सामाजिक एकतेच दर्शन घडविले आहे. कल्याणपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मलंगगडावर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. मलंगगडावर असलेला हिंदू व मुस्लिम धर्मातील तिढा न्यायालयात आहे. मात्र हे सर्व विसरून हिंदू-मुस्लिम भाविकांनी सामाजिक आणि धार्मिक एकोपा जोपासला आहे.

एकीकडे दोन्ही धर्मीयांकडून एकतेच दर्शन घडवल्याने दोन्ही समाजामध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील भाविकांनी मध्यरात्री गडावर जाऊन नारळी भात आणि नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी केली.याच वेळी रक्षाबंधनसुद्धा साजरा करण्यात आला. आज राखी पौर्णिमा उत्सव आहे. बहीण-भावाच्या अतूट नात्याची साक्ष देणारा हा सण. या निमित्ताने आजच्या दिवशी या हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना राखीच्या धाग्यात बांधून एका नव्या नात्याची आठवण सगळ्यांना करून दिली आहे. स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन एकाच दिवशी असल्याने राष्ट्रीय एकात्मतेला हातभार लावणाऱ्या घटनेने स्वातंत्रोत्सवाचा आनंद व्दिगुणीत झाल्याची भावना येथील भाविकांची आहे.

 

Leave a Comment