वयाच्या ७४ व्या वर्षी पूर्ण झाली मातृत्वाची इच्छा ; जुळया मुलींना दिला जन्म

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | आंध्रप्रदेशमध्ये रहाणाऱ्या एका महिलेची मातृत्वाची इच्छा वयाच्या ७४ व्या वर्षी पूर्ण झाली आहे. एर्रामत्ती मंगम्मा असे या महिलेचे नाव असून आयव्हीएफ तंत्राच्या सहाय्याने या महिलेने दोन जुळया मुलींना जन्म दिला आहे. यापूर्वी २०१६ साली पंजाबमध्ये रहाणाऱ्या दलजिंदर कौर यांची वयाच्या ७० व्या वर्षी प्रसुती झाली होती. एर्रामत्ती यांचे पती राजा राव ८० वर्षांचे आहेत. हे जोडपे पूर्व गोदावरी जिल्ह्यातील नीलापार्थीपाडू गावामध्ये रहाते.एर्रामत्ती यांनी कोथापेट येथील अहाल्या रुग्णालयात जुळया मुलींना जन्म दिला.

शस्त्रक्रिया सुरळीत पार पडली. आई आणि मुली दोघांची प्रकृती उत्तम आहे. शस्त्रक्रियेच्यावेळी कुठलीही अडचण निर्माण झाली नाही अशी माहिती डॉक्टर उमाशंकर यांनी दिली. वय जास्त असले तरी एर्रामत्ती मंगम्मा यांना हायपरटेंशन, मधुमेह अशा आरोग्याच्या समस्या नसल्यामुळे प्रसुतीमध्ये कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या नाहीत असे डॉक्टरांनी सांगितले.प्रसुतीनंतरही मंगम्मा यांना भविष्यात कुठली मोठी शारीरिक समस्या उदभवेल असे  मला वाटत नाही असे डॉक्टरांनी सांगितले.

मंगम्मा यांच्या वयोमानामुळे मुलींसाठी मिल्क बँकमधून दुधाची व्यवस्था करण्यात येणार आहे. राजा राव हे पेशाने शेतकरी आहेत. एर्रामत्ती आणि राजा राव यांचा विवाह २२ मार्च १९६२ रोजी संपन्न झाला. लग्न झाल्यापासून ५७ वर्ष त्यांच्या घरामध्ये पाळणा हलला नव्हता. वेगवेगळया डॉक्टरकडे उपचार केले पण एर्रामत्ती मंगम्मा यांना गर्भधारण होत नव्हती.मागच्यावर्षी एर्रामत्ती यांना शेजारी रहाणारी महिला आयव्हीएफ तंत्राने वयाच्या ५५ व्या वर्षी गर्भवती राहिल्याचे समजले.

त्यावेळी त्यांनी सुद्धा आयव्हीएफने आई बनण्याचा निर्णय घेतला. या वयामध्ये त्यांची आई बनण्याची इच्छाशक्ती पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो. आम्ही त्यांच्या वेगवेगळया चाचण्या केल्या. त्यातून आयव्हीएफद्वारे प्रसुतीसाठी त्या पूर्णपणे फिट होत्या अशी माहिती डॉक्टर उमाशंकर यांनी दिली.

Leave a Comment