मुंबई : प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा सातत्याने प्रत्यय येत असतो. अशाच ढिसाळ कारभाराचे दर्शन राज्याच्या गृहविभागामुळे समोर आले आहे. राज्याच्या गृह विभागाने १४ पोलीस अधिकाऱ्यांना आपली मालमत्ता जाहीर करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांना आपली संपत्ती जाहीर करायची आहे अशा अधिकाऱ्यांमध्ये शहीद पोलीस अधिकारी अशोक कामटे आणि आत्महत्या केलेले पोलीस अधिकारी हिमांशु राय यांचा समावेश करण्यात आला आहे. या बरोबरच या यादीत काही निवृत्त अधिकारी, तसेच काहींना पदावरून हटवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. गृह विभागाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात एकूण १४ आयपीएस अधिकाऱ्यांची यादी राज्य सरकारकडे पाठवली होती. यादीत समाविष्ट असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपले वार्षिक उत्पन्न जाहीर केलेले नाही, असे विभागाने राज्य सरकारला कळवले आहे.
आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारपुढे आपली वार्षिक संपत्ती घोषित करावी लागते. विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी तशी संपत्ती घोषित करायची आहे, अशा अधिकाऱ्यांमध्ये विभागाने दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशु राय यांचा समावेश करण्यात आला आहे. रॉय यांनी मे २०१८ मध्ये आत्महत्या केली होती. तर, या यादीत माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के. सहाय यांच्याही नावाचा समावेश आहे. सहाय यांचा २०१३ मध्ये जळून मृत्यू झाला होता. तसेच या यादीत २०१८ मध्ये निवृत्त झाल्यानंतर १५ दिवसांत मृत्यू पावलेले माजी पोलीस उपायुक्त आनंद मांड्या यांच्या नावाचाही समावेश आहे.
१४ जणांमध्ये केवळ ६ नोकरीत
या यादीत एकूण १४ पोलीस अधिकाऱ्यांची नावे असून त्यांपैकी फक्त ६ अधिकारीच सध्या नोकरीत आहेत. यात पी.एन. रासकर, दलबीर सिंह भारती, अजय कुमार बंसल, पी.एन. मगर, अंकित गोयल आणि हिरानी ए. मोहन कुमार यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणीची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृह विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव संजय कुमार यांनी सांगितले.