कोल्हापूर, प्रतिनिधी, सतेज औंधकर : शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ महोत्सवात देशभरातील अनेक मान्यवर प्रकाशकांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या स्टॉलवर अभ्यासक्रमातील अनेकविध विषयांच्या संदर्भग्रंथांसह महत्त्वाच्या अवांतर वाचनासाठीही हजारो पुस्तके उपलब्ध आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या वतीने राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहासमोरील आमराईमध्ये भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते. यंदा ग्रंथ प्रदर्शनाचे १४ वे वर्ष आहे. प्रदर्शनात सुमारे ३३ स्टॉल मांडण्यात आले आहेत.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या क्रमांक १ च्या स्टॉलचे फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या छायाचित्रांना कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनही करण्यात आले. कुलगुरूंसह सर्व मान्यवरांनी यावेळी सर्व स्टॉलधारक प्रकाशक व अन्य सहभागींची सदिच्छा भेट घेऊन त्यांना विद्यापीठाची दैनंदिनी भेट देऊन स्वागत केले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन, उपग्रंथपाल डॉ. डी.बी. सुतार, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. पी.बी. बिलावर, डॉ. एस.व्ही. थोरात, इंटरनेट विभागाचे समन्वयक डॉ. मिलींद जोशी, परीक्षा विभागाचे उपकुलसचिव एन.एम. आकुलवार, सहाय्यक कुलसचिव निवास माने यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.