सशक्त भारत निर्मितीसाठी आणि समाजाच्या विकासासाठी युवकांनी गुणवत्ता दाखवावी – मदन येरावार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई |सतिश शिंदे

सशक्त भारताच्या निर्माणासाठी तसेच समाजाच्या विकासासाठी युवकांनी आपली गुणवत्ता उपयुक्त असल्याचे दाखवून द्यावे; सर्वसामान्यांचे दुःख आपलेसे करून ते दूर करण्याची सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग विभागाचे राज्यमंत्री मदन येरावर यांनी आज येथे केले. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग विभागामार्फत 2017-18 मध्ये 10 व 12 वी परीक्षेत राज्यात तसेच विभागीय मंडळामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना स्व.वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान सोहळा सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी श्री.येरावर बोलत होते. याप्रसंगी विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता, सहसचिव भा. र. गावित, अवर सचिव प्रफुल्ल ठाकूर आदी उपस्थित होते.

अनेक अडचणींवर मात करून आपण सर्वोत्कृष्ट, गुणवंत विद्यार्थी असल्याचे सिद्ध केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून श्री.येरावर म्हणाले, प्रशासन, अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी क्षेत्रात करियर घडविण्याची अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते. माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांनी समाजाच्या विकासाची दूरदृष्टी बाळगली. त्यांनी हरितक्रांतीला चालना दिली. स्व.सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य दिले. त्यांचा आदर्श आज ठेवण्याची गरज आहे. हे पाहता याबरोबरच समाजकारणही एक महत्त्वाचे क्षेत्र आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिकतेकडे जात असतानाच आपल्याला अनेक आव्हानांनाही सामोरे जायचे आहे. आपल्या देशात अनेक जाती, धर्म, पंथ आहेत. मात्र, या सर्वांना जोडून ठेवणारी आपली संस्कृती जपत असताना सर्वसामावेशक धोरणाने वाटचाल करायची आहे.

अतिरिक्त 500 कोटींची तरतूद- श्री. येरावार म्हणाले, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्गातील सर्व घटकांची प्रगती व्हावी या हेतूने हा नविन विभाग निर्माण करण्यात आला. विभागाने अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. आता या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी अतिरिक्त 500 कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे. स्पर्धापरीक्षांमध्ये आश्रमशेतील विद्यार्थी झळकावेत यासाठी लवकरच एक नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. विभागाच्या स्थापनेपासून नॉन-क्रिमिलेयरच्या उत्त्पन्न मर्यादेत वाढ, विद्यार्थी- विद्यार्थिंनींसाठी वसतिगृहे, सुधारणांसह यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, व्यवसाय प्रशिक्षण तसेच या घटकातील दरवर्षी 10 विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आदी अनेक योजना राबविण्यात येत आहेत.

सचिव श्री.गुप्ता म्हणाले, दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यामागे त्यांना पुढील आयुष्यात आणखी यशशिखरे पादाक्रांत करण्यास प्रोत्साहन देणे आणि इतर विद्यार्थ्यांनी त्यांची प्रेरणा घ्यावी हा उद्देश आहे. सजग नागरिक म्हणून स्वत:ला घडविण्यासाठी या सन्मानाचा ते निश्चितच उपयोग करतील.

या कार्यक्रमात 40 विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यस्तरावर प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र तर विभागीय मंडळात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना 50 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यात प्रथम आलेली विद्यार्थिंनी तेजल इरकर आणि शुभम वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Comment