सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगली लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा मित्रपक्षाला न देता कॉंग्रेसकडेच राहावी, या मागणीसाठी महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर व जिल्हा परिषदेचे सदस्य विशाल चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांना नांदेड येथे भेटून साकडे घातले.
सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर पक्षांची आघाडी झाली आहे. स्वाभिमानीला कॉंग्रेसने सांगलीची जागा देण्याचे निश्चित केले आहे. मात्र मित्र पक्षाला जागा न देता कॉंग्रेसने या मतदारसंघात लढावे, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद, महापालिकेत जरी सत्ता नसली तरी कॉंग्रेस सक्षमपणे विरोधी पक्षाची भूमीका बजावत आहे. त्यामुळे सांगलीची जागा मित्रपक्षाला सोडू नये, असे साकडे घालण्यात आले.
ही जागा कॉंग्रेसने लढवावी की स्वाभिमानी शेतकरी संघटनेने, याचा निर्णय आता स्थानिक पातळीवर कॉंग्रेसचे नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी घेतील. त्यांच्यात लवकरच बैठक होईल. या बैठकीत समन्वयाने निर्णय घ्यावा. तशा सूचना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आ.सतेज पाटील यांना दिल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघात सकारात्मक असा निर्णय लवकरच होईल, अशी ग्वाही अशोक चव्हाण यांनी दिली.