सिद्धगिरी संस्थानतर्फे पूरग्रस्त लोकांसाठी घरकुल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | पूरग्रस्तांसाठी अन्न, वस्त्रांची मदत श्री क्षेत्र सिद्धीगिरी मठाच्या माध्यमातून करण्यात आली. यापुढे सिद्धीगिरी संस्थानाच्या वतीने पूरग्रस्त लोकांसाठी घरकुल उभारण्यासाठी कृतीशील कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे असं अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

पूरपरिस्थितीमध्ये पूरग्रस्तांसाठी आलेल्या शासकीय मदत पथकाला जेवण पुरवणे, पूरग्रस्तांना जेवण, पूर ओसरल्यानंतर पशुवैद्यकीय तपासणी, ग्राम स्वच्छता, मृत जनावरांची विल्हेवाट लावणे, एका कुटुंबाला १० दिवस पुरेल इतक्या संसारपयोगी साहित्याचे वाटप,जनावरांसाठी चारा छावण्या, अनेक गावांत पशुखाद्य पुरवणे, सिद्धीगिरी हॉस्पिटलच्या वतीने ५४ पूरग्रस्त गावांतील ७,२६९ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधांचे वाटप करण्यात आल्याचं महाराजांनी सांगितलं.

शिरोळ तालुक्यात राजापूर गावात मठाच्या वतीने तात्पुरत्या स्वरुपाच्या १०० घरकुलाच्या निर्मीतीचे काम सुरु असून कायम स्वरुपी घरकुलांसाठी मठ कृतीशील आहे. अन्य गावातही घरकुल निर्मितीचे कार्य करण्यात येणार आहे. लुपिन सारख्या अन्य उद्योग-संस्थांनी घरकुल उभारणीसाठी पुढे येऊन पुढाकार घ्यावा, असे काडसिद्धेश्वर स्वामींनी सांगितले.

यावेळी लुपिन फाउंडेशनच्या वतीने घरकुल उभारणीसाठीची मदत सिद्धिगिरी मठाकडे देणार असल्याचे योगेश प्रभू यांनी सांगितले. यावेळी योगेश प्रभू, प्रल्हाद जाधव,विकास जाधव,विक्रम पाटील, अमित हुक्केरीकर उपस्थित होते.

Leave a Comment