नवी दिल्ली । आधी प्रसार माध्यम आणि आता संसदेत सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर संसदेत काथ्याकूट होण्याची शक्यता आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात समोर आलेला ड्रग्सचा मुद्दा सोमवारी संसदेत पोहोचला आहे. भाजपाचे खासदार आणि अभिनेता रवी किशन यांनी लोकसभेत ड्रग तस्करीचा मुद्दा मांडला आणि केंद्र सरकारकडे मोठ्या पातळीवरील तपासाची मागणी केली.
रवी किशन म्हणाले की, “ड्रग्स तस्करीची समस्या वाढत आहे. देशाच्या तरूण पिढीला ड्रग्सच्या माध्यमातून उध्वस्त करण्यासाठी षडयंत्र रचले आहे. आपले शेजारील देश यासाठी योगदान देत आहेत. दरवर्षी पाकिस्तान व चीनमधून पंजाब व नेपाळ मार्गे आपल्या देशात अंमली पदार्थांची तस्करी केली जात आहे.
चित्रपट जगतात देखील ड्रग्सचे व्यसन जडत आहे. अनेक जणांना अटक करण्यात आलेली आहे, एनसीबी खरोखर चांगले काम करत आहे. मी केंद्र सरकारकडे मागणी करतो की, याप्रकरणातील दोषींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. तसेच, आपल्या शेजारील देशांचे कटकारस्थान संपुष्टात आणावे” असे देखील रवी किशन यांनी लोकसभेत म्हटलं.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात ड्रग्सचा मुद्दा समोर आल्यानंतर, आता त्या दृष्टीने देखील तपास सुरू आहे. नारकोटिक्स ब्यूरोने याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह जवळपास सहा ते सात जणांना अटक केलेली आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीकडून अनेक ड्रग्स पेडलर्सला अटक देखील करण्यात आलेली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्सच्या रॅकेटचा शोध घेतला जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.