परभणी प्रतिनिधी, गजानन घुंबरे : मागील काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी शहराला साई जन्मभूमी म्हणून शंभर कोटी रुपयांचा विकास निधी देण्याची घोषणा केली अन् शिर्डी व पाथरी या दोन साई संस्थानांमधील वाद चांगलाच चिघळला. शिर्डीवासीय पाथरीला साई जन्मस्थान मानायला तयार नाहीत आणि इकडे पाथरीकर मात्र आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचे बोलत आहेत. या सर्व प्रकरणावर मराठवाड्यातील राजकीय नेत्यांनीही जन्मस्थान म्हणून पाथरीच्या विकासाला आडफाटा आणू नका असं म्हणत पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान आहे याचे समर्थन केले आहे.
धनंजय मुंडे आणि अशोक चव्हाण यांचेही समर्थन
यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपल्या फेसबुक पेज भरून पाथरी साईबाबा जन्मस्थान असल्याबद्दल फेसबुक पोस्ट करत समर्थन दर्शवलं होतं, आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचेही समर्थनार्थ वक्तव्य आले आहे. यात आता सोशल मिडीयावरिल नेटकऱ्यांनी उडी घेतली आहे. साईबाबांचे जन्मस्थान पाथरी आहे, हे दर्शवण्यासाठी नेटकरी मंडळींनी सोशल मीडियाचा आधार घेत ‘हॅशटॅग ट्रेंड’ राबवत अनोखे आंदोलन सुरू केले आहे.
परभणी व मराठवाड्यातील सोशल मीडियावर #SaiBirthPlacePathri हा हॅशटॅग ट्रेंड करत साईबाबांचा जन्म पाथरीचाच असल्याचा आता नेटकरी दावा करत आहेत. अल्पावधीतच हा ट्रेंड मराठवाड्यात लोकप्रिय झाला असून महाराष्ट्रातील इतर ठिकाणांहून ही या ट्रेन्डला चांगले समर्थन मिळत आहे. तर परभणी जिल्ह्यातील प्रमुख राजकीय मंडळींनीही या ट्रेंडला समर्थन दिले असून, आपापल्या अधिकृत फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अकाउंटवर हा ट्रेंड जोरदारपणे चालवण्याचे आवाहन परभणीकरांना केले आहे.
श्री साई जन्मभूमी कृती समिती अध्यक्ष व विश्वस्त आ. बाबाजानी दुर्राणी , माजी आ. विजय भांबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, संभाजी ब्रिगेडचे छगन शेरे यांच्यासह या कृती समितीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी या ट्रेंडला जोरदार समर्थन दिले आहे.