औरंगाबाद : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून मनपाच्या कर वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आता नवीन कामाचा शुभारंभ न करता केवळ पाणीपुरवठा आणि ड्रेनेजच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू राहणार असल्याची माहिती मिळत आहे. मनपाने या कामासाठी प्रत्येक झोन कार्यालयाला 1 कोटी 20 लाखांचे बजेट दिले आहे.
पाणीपुरवठा आणि ड्रेनेज या विभागाची कामे तात्काळ करावी लागतात. त्यामुळे या कामांसाठी झोन कार्यायलयनिहाय पॅकेज देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पाणीपुरवठ्यासाठी 60 लाख, तर ड्रेनेजच्या दुरुस्तीसाठी 60 लाख असे एकूण एक कोटी 20 लाखांचा निधी झोन कार्यालयांना देण्यात आला आहे. मनपाची 9 झोन कार्यालय आहेत. 9 झोन कार्यालयांसाठी दहा कोटी 80 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
मनपाची करवसुली पूर्णपणे ढेपाळली आहे. यासाठी कोरोनाचे कारण दिले जात आहे. गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाची लागण सुरू झाली. त्यामुळे मार्चमध्ये होणारी वसुली झाली नाही. तोरणाची पहिली लाट चार ते पाच महिने होती. त्यामुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. याचा परिणाम करवसुलीवर झाला. फेब्रुवारी ते जर या पाच महिन्यात बहुतांश व्यवहार बंद होते. त्यामुळे कर वसुली झाली नाही. त्याचा परिणाम शहरातील विकास कामावर झाला आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे वगळता अन्य कोणतीही विकास कामे महापालिकेच्या निधीतून करायची नाही, असा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला.