सातारा जिल्ह्यात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अज्ञाताचा चाकू हल्ला; वार करून हल्लेखोर पसार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी (खळे) येथील दहावीमध्ये शिकणाऱ्या आणि शाळेत निघालेल्या विद्यार्थीनीवर अज्ञाताकडून चाकुने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

शिद्रुकवाडी येथील दहावीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरातून गावानजीक असणाऱ्या खळे येथील शाळेकडे पायी चालत निघाली होती. त्यावेळी शिद्रुकवाडी-खळे मार्गावर एका आडोशाच्या ठिकाणी एका युवकाने विद्यार्थिनीला अडवले.

तिला काही समजण्यापूर्वीच त्याने सोबत आणलेल्या चाकूने त्या विद्यार्थिनीवर वार करण्यास सुरुवात केली. क्षणार्धात संबंधित मुलगी रक्तबंबाळ झाली. हल्लेखोराने तिच्या नाक, कान, पाय आणि हातावर तब्बल सात वार केले. या परिस्थितीतही संबंधित मुलीने त्या हल्लेखोराचा प्रतिकार केला. त्यावेळी तिची हल्लेखोराशी झटापट झाली. अखेर हल्लेखोराने नजीकच्या उसाच्या शेतातून पळ काढला.

दरम्यान, गंभीर जखमी झालेली ती मुलगी त्याच स्थितीत शाळेमध्ये गेली. शाळेत गेल्यानंतर रक्तबंबाळ स्थितीत विद्यार्थिनीला पाहून शिक्षक हादरले. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवल. तसेच घटनेची माहिती पोलिसांना व तिच्या पालकांना देण्यात आली. पोलिसांनी संबंधित मुलीकडे हल्लेखोराबाबत चौकशी सुरू केली आहे.

Leave a Comment