हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील १० वी च्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला असून आता ११ वीच्या ऍडमिशन ची तयारी सुरु आहे. जर तुम्हीही याच वर्षी १० वी उत्तीर्ण झाला असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. १० वी पास विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार कडून मोफत टॅबलेट देण्यात येत आहे. ज्यामुळे पुढच्या अभ्यासाला विद्यार्थ्यांना मदत होईल. हे टॅबलेट मिळवण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करावा? कोणकोणती कागदपत्रे यासाठी लागू शकतात याचीच संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊयात.
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून महाज्योती योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 10वी मध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना टॅब व नेट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इतकंच नव्हे तर महाज्योती मार्फत JEE / NEET / MHT – CET परीक्षासाठी मोफत प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. यामुळे बारावी सायन्स नंतर इंजीनियरिंग किंवा मेडिकल क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण मिळू शकणार आहे.
मोफत टॅबलेटसाठी काय आहे पात्रता??
१) सदर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
२) इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.
३) उमेदवार हा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्येच म्हणजेच नुकताच पास झालेला असावा.
४) विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा.
५) विद्यार्थ्यांची निवड ही दहावीच्या टक्केवारीनुसारच केली जाईल.
६) शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% किंवा या पेक्षा जास्त गुण असावे.
७) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असावे.
आवश्यक कागदपत्रे –
मोफत टॅबलेट च्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, 10 वी चे गुणपत्रक, 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचे बोनाफाईट व ऍडमिशनची स्लिप, दिव्यांग / अनाथ असल्यास प्रमाणपत्र ही कागदपत्रे सादर करावी लागतील.
कुठे करावा अर्ज?
तुम्हीही या योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला http://www.mahajyoti.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल.