व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

युवतीवर बळजबरी करणाऱ्या युवकास 10 वर्षे सश्रम कारावास

कराड | लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर बळजबरी करणाऱ्या युवकास कराड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधिश के. एस. होरे यांनी दहा वर्षांचा सश्रम कारावास व 5 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सुलतान उर्फ तोफिक पटेल असे शिक्षा झालेल्याचे नाव असल्याचे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना अॅड. राजेंद्र सी शहा यांनी सांगितले की, वहागाव येथे पाच वर्षांपूर्वी डिसेंबर 2016 रोजी पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर अशियायी महामार्गालगत ट्रकमध्ये आरोपी तोफिक पटेल याने एका युवतीला तुझ्यावर माझे प्रेम आहे, असे म्हणत लग्नाचे आमिष दाखवत बळजबरी केली होती. त्यावेळी या घटनेची तळबीड पोलीस ठाण्यात नोंद होऊन तौफिक पटेल याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

या घटनेचा तपास तात्कालीन सपोनि विद्या जाधव यांनी केला होता. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील आणि सपोनि जयश्री पाटील यांनी घटनेचा सखोल तपास करून आरोपी तोफिक पटेल याच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करत दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार 21 सप्टेंबर रोजी न्यायालयात या खटल्याची अंतिम सुनावणी झाली. यावेळी सरकारपक्षातर्फे अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. सरकार पक्षाकडून 9 साक्षीदारांना तपासण्यात आले. अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी सादर केलेले साक्षी पुरावे व केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सुलतान उर्फ तोफिक पटेल यास दोषी धरत 10 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 1 महिन्याचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. अॅड. राजेंद्र सी. शहा यांना शिंदे, पाटील, कार्वेकर, गोविंद माने, अशोक मदने, गोरे, पाटील, पवार यांनी सहकार्य केले.