कोण मारणार बाजी : गृहराज्यमंत्र्यांच्या पाटण सोसायटी गटात 100 टक्के मतदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण/ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी पाटण सोसायटी मतदार संघातून 102 पैकी सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने सोसायटी मतदार संघात शंभर टक्के मतदान झाले. सोसायटी मतदारसंघाचे उमेदवार गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. अत्यंत चुरशीच्या वातावरणात दोन्ही बाजूंनी स्पर्धात्मक मतदान झाले. मतदान प्रक्रिया अत्यंत शांतपणे पार पडली असून मंगळवारी दि.23 रोजी होणाऱ्या निकालाकडे आता सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत .

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाटण सोसायटीसह काही अन्य मतदासंघाच्या निवडणुकीसाठी रविवारी पाटण येथील कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल येथे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ ते सायंकाळी पाच ही मतदानाची वेळ होती. सकाळी आठ वाजण्यापुर्वीच मतदान केंद्रावर सोसायटी मतदारसंघातील मतदारांनी रांगा लावून अत्यंत उत्साहात मतदान केले. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणकर गटाच्या तर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देसाई गटाच्या मतदारांनी यासाठी येथे शंभर टक्के मतदान केले. पाटण सोसायटी मतदारसंघातून एकूण 104 ठराव झाले होते, त्यापैकी घोटचा ठराव बाद झाला तर बनपुरी येथील एका मतदाराचा मृत्यू झाल्याने 102 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये उमेदवार ना. देसाई , सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर , मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, टाटाचे नेते कामगार नेते सुजित पाटील आदी मान्यवर पदाधिकारी व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून अत्यंत चुरशीने मतदान पाहायला मिळाले. मतदान केंद्राबाहेर पाटणकर, देसाई समर्थकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान केंद्रावर उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांनी भेट दिली. पाटणचे पो.नि. एन. आर. चौखंडे व मल्हारपेठचे स.पो.नि. उत्तम भापकर यांनी चोख पोलीस बंदोबस्तात शांततेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

या निवडणुकीत सोसायटी मतदार संघासाठी 103 पैकी एक मयत मतदार वगळता इतर सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नागरी पतसंस्था मध्ये 29 पैकी 29 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय अन्य महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय ,खरेदी विक्री संघ, कृषी उत्पादन प्रक्रिया, गृहनिर्माण ,दूध संस्था ,औद्योगिक विणकर आदींसाठीच्या 203 मतदारांपैकी 197 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Leave a Comment