लसीकरणाला गती ! औरंगाबाद तालुक्यातील 30 गावांत 100 टक्के लसीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठीचे नियम अधिक कठोर केल्याने विविध गावांमधील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यातच कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूच्या चिंतेने अवघ्या जगाची चिंता वाढवली असतानाच औरंगाबाद जिल्ह्यात मात्र यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगलाच वेग मिळाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात औरंगाबाद तालुका आघाडीवर असून सर्वाधिक 30 गावांत शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिल्यानंतर मागील 15 दिवसांपासून जिल्हाधिकाऱ्यांनी विविध आदेश काढून लसीकरणाला गती मिळण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले. लस न घेतलेल्या नागरिकांना पेट्रोल, डिझेल, रेशन, औषधी, प्रवास, पर्यटन आदी कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत, असे आदेश संबंधित विभागांना दिले होते. त्यानंतर सर्वच ठिकाणच्या लसीकरणाला वेग आला. जिल्ह्यात आतापर्यंत 72 टक्के लसीकरण पूर्ण झाले. यात 18.53 लाख पुरुष, 15.21 लाख महिलांचे लसीकरण झाले. यात 18 ते 44 वयोगटात सर्वाधिक 20.43 लाख लोकांनी लस घेतली तर 45 ते 60 वयोगटातील 7.81 लाख लोकांनी लस घेतली. 5.21 लाख जण हे 60 वर्षांवरील लसवंत आहेत. या सर्वांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतला आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठीही जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. ग्रामीण भागात सध्या रबी हंगाम पेरणीसह कापूस वेचणी, मिरची तोडणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश केंद्रावरची लसीकरणाची वेळ बदलून सकाळऐवजी दुपापासून रात्री उशीरापर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे कामे आटोपून आलेल्या नागरिकांना ते अधिक सोयीचे झाले आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांचाही लसीकरणाला जास्त प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Comment