Satara News : कासच्या सुधारित जल वाहिनीच्या कामासाठी 102 कोटींची तरतूद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा शहरानजीक असलेल्या महत्वाच्या अशा कास तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. पावसाळ्यात त्याठिकाणी होणाऱ्या पूर्ण क्षमतेने पाणीसाठ्याचा पुरेपूर वापर सातारा शहरातील नागरिकांना व्हावा यासाठी सातारा पालिकेच्यावतीने सुधारित जलवाहिनीचे काम केले जात आहे. या कामासाठी तब्बल १०२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ब्रिटिशकालीन तलाव म्हणून ओळख असणाऱ्या या कासमधून सातारा शहराला गेली अनेक वर्षे पाणीपुरवठा केला जात आहे. खापरी वाहिनीतून होणाऱ्या या पाणीपुरवठ्यानंतर तात्कालीन आमदार तथा खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून बंदिस्त वाहिनी उभारण्यात आली. गेल्या २० वर्षाहून अधिक काळ या बंदिस्त वाहिनीतून शहरातील विविध भागास पाणीपुरवठा केला जात आहे.

तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम पालिकेमार्फत हाती घेण्यात आले होते. वनविभागासह इतर परवानग्या मिळाल्यानंतर हे काम सुरू करण्यात आले होते. हे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. कामास १०२ कोटींचा निधी मिळाल्यानंतर त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया पालिकेने पूर्ण करत ते काम एका ठेकेदारास दिले आहे. या ठेकेदाराने सुधारित जलवाहिनीच्या कामास नुकतीच सुरुवात केली आहे.

जलवाहिण्याचे काम पूर्ण करण्यासाठी पाच टप्पे ठरविण्यात आले आहेत. या टप्प्यात वेगवेगळ्या व्यासाच्या वाहिन्या वापरण्यात येणार आहे. तसेच सांबरवाडी तसेच पॉवर हाऊस येथील टाक्यांना पूर्ण दाबाने अखंडित पाणी मिळणार आहे. या कामासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.