शहरात दोन वर्षात 12 लाख 50 हजार कोरोना तपासण्या

औरंगाबाद – मागील दोन वर्षापासून देशभरात कोरोना तपासण्या मोफत केल्या जात आहेत. परंतु कोरोना टेस्ट वर होणारा कोट्यावधी रुपयांचा खर्च आता शासनाला परवडत नाही. त्यामुळे भविष्यात या तपासण्या सशुल्क कराव्या लागणार आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ॲंटीजेनची कीट 450 रुपयांना खरेदी करण्यात आली. आता खासगी कंपन्या त्याच कीट आरोग्य यंत्रणांना अवघ्या 9 रुपयांना विकत आहेत.‌ कोरोनाची पहिली लाट मार्च 2020 मध्ये आली. तेव्हा कोरोना तपासण्या कशा करायच्या असा प्रश्न पडला. केंद्र राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे अँटीजेन, आरटीपीसीआर पद्धतीने तपासणी करण्यासाठी खाजगी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात किट खरेदी करण्यात आल्या. कीट मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणेची मोठी दमछाक होत होती. औरंगाबाद महापालिकेने दिल्ली येथील खासगी कंपनीकडून किट खरेदी केल्या होत्या. ॲंटीजेनची एक किट 450 रुपयांना तर आरटीपीसीआरची एक किट 110 रुपयांना देण्यात आली. हळूहळू कंपन्यांनी किटचे दर कमी केले. आता ॲंटीजेनची कीट 9 रुपये 50 पैसे तर आरटीपीसीआर 13 रुपये 50 पैशांना मिळत आहे.

राज्य शासनाने महापालिकांना किट खरेदी साठी लागणारी रक्कमही नंतर प्रदान केली. औरंगाबाद महापालिकेला आतापर्यंत 18 ते 20 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. मागील दोन वर्षांमध्ये शहरात 7 लाख 32 हजार 764 ॲंटीजेन तपासण्या करण्यात आल्या तर 5 लाख 29 हजार 217 आरटीपीसीआर तपासण्या केल्या. आता महापालिकांनी कोणत्याही प्रकारच्या किटची खरेदी करू नये असे आदेश शासनाने दिले आहेत. शासनच किट खरेदी करून महापालिकांना देणार आहे. भविष्यात मोफत तपासण्या बंद करण्याचा विचारही शासनाने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.