कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक साहित्यासाठी 12 लाख 73 हजार रुपये : रुचेश जयवंशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

कोविडमुळे एक व दोन्ही पालक गमावेल्या बालकांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी मागणी केल्यानुसार शैक्षणिक लाभ, साहित्य, वसतिगृह शुल्क यासाठी 180 बालकांच्या बँक खात्यावर बाल न्याय निधी अंतर्गत प्राप्त झालेला निधी रक्कम 12 लाख 73 हजार 616 रुपये तात्काळ जमा करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हास्तरीय कृतीदल समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

रस्त्यांवर फिरणारे बालके आढळल्यास त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या परवानीने बालगृहात दाखल करा, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य या योजनेची तालुकास्तरावरील गठीत केलेल्या समन्वय समितीने प्रभावी अंमलबजावणी करावी.

मिशन वात्सल्य अंतर्गत लाभासाठी निश्चित केलेल्या कुटुंबांची संख्या 3 हजार 427 इतकी आहे. यामधील बाल संगोपनाची जास्तीत जास्त प्रकरणे मंजूर करावीत. तसेच वारस प्रमाणपत्र व जातीच्या प्रमाणपत्राची कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी केल्या.