‘या’ जिल्ह्यातील धान्याची उचल न करणाऱ्या 14611 शिधापत्रिका रद्द !

परभणी : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून धान्याचा लाभ देण्यात येतो. लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्यासाठी ई-पॉस मशीनवर लाभार्थ्यांचे आधार अधिप्रमाणित करुन धान्य वितरित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार सीडींग पूर्ण होणे आवश्यक आहे.

ज्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार सीडींग करून घेतलेली नाही. अशा सदस्यांची नावे ऑनलाईन आरसीएमएस प्रणालीतून वगळण्यात येणार आहे. तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना अनुज्ञेय असलेले धान्य मागील अनेक वर्षापासून उचल केली नाही किंवा आधार कार्ड संबंधित नोंदी अद्ययावत केलेल्या नाहीत अशा एकूण 14 हजार 611 शिधापत्रिकेचा आरसीएमएस प्रणालीतून वगळण्यात आल्या आहेत.

त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी त्यांना अनुज्ञेय असलेले धान्य दरमहा उचल करावी. तसेच शिधापत्रिका मधील व्यक्तींचे आधार सीडींगचे काम पूर्ण करून घ्यावे. यापुढे शिधापत्रिकाधारकांनी आधार सीडिंग करून घेतली नाही अथवा सहा महिन्यापर्यंत धान्य उचल केले नाही. अशा शिधापत्रिकाधारकांची नावे वगळण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.