सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्यावर एका चौथऱ्यावर राजा शिवछत्रपती परिवाराच्यावतीने काही दिवसांपूर्वी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान एक ब्रिटिशकालीन लोखंडी तिजोरी आढळून आली होती. त्याच ठिकाणी रविवारी पुन्हा मोहीम राबविण्यात आली. त्या ठिकाणी मोहिमेतील लोकांनी स्वच्छता केली असता मातीच्या ढिगाऱ्यातून अजून एक लहान तिजोरी आढळून आली.
अजिंक्यताऱ्यावर आढळलेल्या दुसऱ्या ब्रिटिशकालीन तिजोरीचे वजन सव्वाशे ते दीडशे किलो असल्याने किल्ल्याच्या महाद्वारापर्यंत आणण्यात मोठे कष्ट घ्यावे लागले. तिजोरीसोबत सापडलेल्या कौलांवर ब्रिटिशकालीन मजकूर लिहलेला आहे. हा सर्व ऐवज छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या ताब्यात देण्यात आला आहे. अजिंक्यताऱ्यावर सापडलेल्या पेट्यांचा कालखंड सांगता येणार नाही. मात्र, ही पेटी दारुगोळा किंवा द्रव्य ठेवण्यासाठी तेथील खोलीत ठेवली असावी असा अंदाज अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
सातारा जिल्ह्यात अनेक गड, किल्ले आहेत. त्यांच्या ठिकाणी उखनन केल्यास अनेक ब्रिटिशकालीन व ऐतिहासिक असे ऐवज सापडू शकतात. आता नव्याने सापडलेल्या ब्रिटिशकालीन तिजोरीविषयी इतिहास संशोधकांच्यात मनात कुतूहल निर्माण झाले आहे. सातारा जिल्ह्यातील असलेल्या किल्ल्यांवर अनेक ऐतिहासिक व ब्रिटिशकालीन वास्तू आतापर्यंत सापडलेल्या आहेत.