राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार; काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह १६ पक्षांचा सहभाग

नवी दिल्ली । भारतीय संसदीय प्रणालीप्रमाणे संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने केली जाते. मात्र, उद्यापासून सुरु होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेकेएनसी, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, सीपीआय (एम), सीपीआय, आययूएमएल, आरएसपी, पीडीप, एमडीएमके, केरळ काँग्रेस आणि एआययूडीएफ यांचा समावेश आहे.

“आम्ही १६ राजकीय पक्षांद्वारे एक निवदेन जारी केले असून उद्या संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालणार आहोत. या निर्णयामागील मुख्य कारण म्हणाजे केंद्र सरकारने कृषी कायदे सभागृहात विरोधकांशिवाय जबरदस्तीने मंजूर केले आहेत”, असे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाविषयी लोकसभा सचिवालयाने एक माहिती जारी केली आहे. त्यानुसार २९ जानेवारीला सकाळी ११ वाजता राष्ट्रपती एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. तर केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सादर करण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

You might also like