झारखंड हादरले! पतीसमोरचं १७ नराधमांनी केला पत्नीवर सामूहिक बलात्कार; जत्रेहून येते होते परत

दुमका । झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेवर तिच्या पतीसमोरच १७ नराधमांनी बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण झारखंड हादरले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून, त्याचा तपास करत आहोत, असे सांगितले. या प्रकरणी पोलिसांत बुधवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दुमकातील मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत दर मंगळवारी बाजार भरतो. बाजारहाटीसाठी महिला पतीसोबत गेली होती. त्याच गावात जत्रा भरली होती. रात्री उशिरा जत्रेतून ती पतीसोबत घरी परतत होती. त्याचवेळी काही गुंडांनी पतीला धरून ठेवले आणि महिलेवर सामूहिक बलात्कार केला. बुधवारी सकाळी पीडितेने पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच, डीआयजी आणि पोलीस अधीक्षक अंबर लकडा यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह मुफस्सिल पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतली. पीडितेच्या जबाबाच्या आधारे तात्काळ तपास करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

पीडितेने एका आरोपीला ओळखले
उपमहानिरीक्षक सुदर्शन प्रसाद मंडल यांनी सांगितले की, या घटनेतील आरोपींची ओळख पटवण्यात येत आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. १७ आरोपींपैकी एकाची ओळख पटली आहे. तो तिच्याच गावातील असल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले आहे.

पतीला पकडून ठेवले
पीडितेच्या पतीने सांगितले की, दर मंगळवारी बाजार भरतो. बाजारहाटीसाठी तो पत्नीच्या सोबत गेला होता. खरेदी करून जवळपास आठ वाजता बाजारातून घरी परतत होते. तेव्हा रस्त्यात १७ जण मद्यधुंद अवस्थेत होते. त्यातील पाच जणांनी त्याला पकडून ठेवले आणि पत्नीला उचलून ते झुडपाच्या दिशेने घेऊन गेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’