प्रेमासाठी कायपण ! तरुणीने पळून जाण्याआधी पूर्ण कुटुंबाला जेवणातून दिलं विष अन्…

सूरत : वृत्तसंस्था – सूरतमध्ये नात्याला काळिमा फसणारी घटना घडली आहे. सूरतमध्ये एका 18 वर्षीय मुलीवर आपल्याच कुटुंबातील सदस्यांना विष देऊन प्रियकरासोबत फरार होत लग्न केल्याचा आरोप आहे. आरोपी मुलीचं नाव खुशबू असं आहे. या प्रकरणात खुशबूचा नवरा सचिन आणि त्याचे वडील अशोक यांचाही हात असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात प्रॉपर्टी ब्रोकर अशोकला अटक केली असून खुशबू आणि सचिन सध्या फरार आहेत. सूरतच्या डिंडोली भागात खुशबू आणि सचिन यांचे कुटुंब एकाच सोसायटीमध्ये राहत होतं. यादरम्यान खुशबू आणि सचिन यांच्यात मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.

खुशबूच्या आई- वडिलांचा या नात्याला विरोध होता कारण ती अल्पवयीन होती. दोन वर्षाआधी ती सचिनसोबत पळूनसुद्धा गेली होती. यानंतर तिला शोधून परत आणण्यात आले. यानंतर खुशबूचे कुटुंब दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले. यानंतरही सचिननं खुशबूसोबतचं आपलं नातं कायम ठेवलं. खुशबू लग्नासाठी 18 वर्ष वय पूर्ण होण्याची तो वाट पाहत होता.18व्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनंतरच तिनं प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्लॅन केला. दोघांनीही 12 सप्टेंबरला खुशबूच्या आई-वडिलांना बेशुद्ध करून घरातून पळून जाण्याचा कट रचला.

प्लॅननुसार खुशबूने पिठामध्ये विष मिसळलं. हे जेवण खाल्ल्यानंतर तिचे आई-वडील आणि भाऊ बेशुद्ध झाले. त्यानंतर ती सचिनसोबत फरार झाली. तिचे वडील वंजारा दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठले. यावेळी आपली मुलगी बेपत्ता असल्याचं पाहून त्यांना मोठा धक्का बसला. खुशबूच्या वडिलांनी आपली पत्नी आणि मुलाला उठवलं. याचदरम्यान वंजारा यांनी पोलिसांनी फोन करून या घटनेची माहिती दिली. यानंतर लग्नाचं रजिस्ट्रेशन करून खुशबू आणि सचिन पोलीस ठाण्यात पोहोचले. दोघांचंही वय पूर्ण असल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं. यानंतर खुशबूच्या वडिलांनी खुशबू, सचिन आणि अशोकवर विष देऊन त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

You might also like