औरंगाबाद | राज्यातील शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयच्या वतीने केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यंदा कोरोना महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्यात येत असून प्रवेश प्रक्रिया मंदावली होती.
काही दिवसांपूर्वी प्रवेश प्रक्रियेसाठी प्रोत्साहन अभियान राबवण्यात आले होते. यामुळे चार दिवसांमध्ये 18 हजार 258 विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केली आहे. यामध्ये 18 हजार प्रवेशासह राज्यात आतापर्यंत 2 लाख 17 हजार 297 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विध्यार्थ्यानी शंभर टक्के प्रवेश घेण्यासाठी आयटीआयचे संचालक दि. अं. दळवी यांनी प्रवेश प्रोत्साहन अभियान रबावण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मराठवाडा विभागातील 1 हजार 534 विद्यार्थ्यांनी आयटीआय मध्ये प्रवेश घेतला आहे. यातील औरंगाबाद येथील 304 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत सात हजार नऊशे दहा विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज केले असून, इतर जिल्ह्यातुन बीड 206, हिंगोली 122, जालना 195, लातूर 228, नांदेड 260, उस्मानाबाद 107 विध्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.