येळेवाडी गावाजवळ पुल व जोड रस्त्यासाठी 2 कोटी 50 लाखाचा निधी मंजूर : खा. श्रीनिवास पाटील

कराड | सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नाने नाबार्डमधून पाटण तालुक्यातील प्रजिमा 54 ते येळेवाडी, लोटलेवाडी, मस्करवाडी, करपेवाडी रस्ता ग्रामा 361 वर येळेवाडी गावाजवळ पुल व जोड रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी 2 कोटी 50 लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. काळगाव विभागातील येळेवाडी, लोटलेवाडी, मस्करवाडी, करपेवाडी रस्ता ग्रामा 361 वर येळेवाडी गावाजवळ पुल व जोड रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी 2 कोटी 50 लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.

येळेवाडी, लोटलेवाडी, मस्करवाडी, करपेवाडी, तेटमेवाडी, धनगरवाडा व इतर छोट्या-मोठ्या वाड्यावस्त्या या मार्गावर आहेत. मात्र या मार्गावर  कमी उंचीचे छोटे पुल असल्याने पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पाण्याखाली जातात. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. दरम्यान भूस्खलन व अन्य नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास अशावेळी हा मार्ग बंद असल्याने बिकट परिस्थिती निर्माण होते. पुल पाण्याखाली गेल्याने सदर गावांचा तालुक्याशी संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत होत असते. तर हा परिसर डोंगरद-यात विखुरला गेल्याने येथील नागरिकांचा सततचा संपर्क हा तळमावले, ढेबेवाडी अथवा कराड शहराशी येत असतो. स्थानिक नागरिकांना नोकरी, रोजगार, व्यापार, बाजारातील खरेदी, औषधोपचारासाठी व अन्य कारणांसाठी याठिकाणी यावे लागते. मात्र हा मार्ग बंद झाल्यास त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या मार्गाची सुधारणा करून पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली होती.

ढेबेवाडी खोऱ्यातील निसरे, मारूल हवेली, गुढे, काळगाव रस्ता प्रजिमा 54 पासून काळगाव खोऱ्याच्या पश्चिम विभागातील येळेवाडी, लोटलेवाडी, करपेवाडी, तेटमेवाडी, डाकेवाडी, निवी, कसणी, माईंगडेवाडी, घोटील आदी गावांना जोडणा-या ग्रामीण मार्गावर नाबार्ड 27 या योजनेतून हा नवीन पूल झाल्यास या गावांचा कायमस्वरूपी प्रश्न सुटणार आहे. तसेच या पुलामुळे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुकाही जोडला जाणार असल्याने या मार्गावरील दळणवळण सुलभ होणार आहे. खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे काळगाव विभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.