पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पिंपरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केली आहे. हा आरोपी तरुण मागच्या काही महिन्यांपासून मृत तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. या दोघांमध्ये एका क्षुल्लक कारणावरून भांडण झाले त्यानंतर आरोपीने आपल्या प्रेयसीची गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना उघडकीस येताच पोलिसांनी काही तासातच संशियत आरोपीला अटक केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
रितू भालेराव असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे. मृत रितू ही मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती काही दिवसांपूर्वी पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आली होती. तर आरोपीचे नाव श्याम ढेरे असे आहे. तोदेखील पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. हे दोघेही मागच्या पाच ते सहा महिन्यांपासून पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. या ठिकाणी हे दोघे नवरा बायकोसारखे राहायचे. मात्र आरोपी श्याम हा आधीपासूनच विवाहित होता.
याची माहिती मृत रितूला समजताच त्यांच्यात खटके उडू लागले. यानंतर रितू श्यामकडे सतत पैशांची मागणी करू लागली. त्यानंतर हा वाद एवढा विकोपाला गेला कि आरोपीने रितूचा गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी श्यामला काही तासातच अटक केली.