National Farmer’s Day| शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा म्हटले जाते. शेतकरी नसता तर जगात धान्य कसे पिकले असते. शेतकरी शेतात धान्य पिकवतो, घाम गळेपर्यंत राब राब राबतो, त्याच्यासमोर किती अडचणी आल्या तरी तो या जगातील कोणत्याच व्यक्तीला उपाशी झोपू देत नाही. त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशात दरवर्षी 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरी केला जातो. आज हाच राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे.
राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आपण सर्वजण देशातील शेतकऱ्यांच्या योगदानानिमित्त कृतज्ञता आणि आदर व्यक्त करतो. संपूर्ण देशामध्ये शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. खरे तर भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे कैवारी स्वर्गीय चौधरी चरणसिंग यांच्या जयंनीमित्त शेतकरी दिन साजरी केला जातो. आजच्या दिवशी नागरिकांना शेतकऱ्यांचे महत्त्व समजावून सांगितले जाते. तसेच या देशांमध्ये शेतकरी कशा पद्धतीने सुखी राहील याबाबत देखील विचार विनिमय केले जातात.
शेतकरी दिनाचा इतिहास (National Farmer’s Day)
देशामध्ये शेतकरी नसता तर धान्य पिकले नसते. त्यामुळे भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. याच शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांबद्दल आणि शेती बद्दल जागृतता निर्माण करण्यासाठी 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिन साजरी केला जातो. 2001 साली माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिनानिमित्त शेतकरी दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. खरंतर तेव्हापासून ते आजवर आपण 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करतो.
शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण ठेवावी
आपल्या सर्वांना जे माहित आहे की शेतकऱ्यांच्या कष्टामुळे सर्वसामान्यांच्या ताटामध्ये अन्न येते. परंतु तरीदेखील या अन्नाचा मान आपल्याकडून ठेवला जात नाही. या अन्नाबरोबरच आपण शेतकऱ्याच्या कष्टाचा देखील मान ठेवत नाही. तसे पाहायला गेले तर आपण नेहमी शेतकऱ्यांचे ऋणी असले पाहिजे. परंतु आपण साधे बाजारात गेलो तरी भाव जास्त सांगितला की त्या शेतकऱ्याला नको ते बोलून येतो. सध्या अवकाळी पावसामुळे बाजार भाव व्यवस्थित न मिळाल्यामुळे तसेच कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आजचा हा दिवस (National Farmer Day) साजरी करत असताना आपण शेतकऱ्यांच्या या अडचणी देखील समजून घेतल्या पाहिजेत. तसेच शेतकऱ्याच्या कष्टाची जाण ठेवली पाहिजे.