आगीचे सत्र थांबेना… मुंब्र्यातील प्राईम रुग्णालयात 4 रुग्णांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रात रुग्णालयांमध्ये आगीचं सत्र सुरू आहे. आता मुंब्रा येथील प्राईम रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे. ही आग पहाटे 3 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास लागली आहे. या आगीमध्ये चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंब्र्यातील प्राईम क्रिटीकेअर या रुग्णालयात पहाटे 3 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर आयसीयूमध्ये असलेल्या सहा रुग्णांना तसेच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर आयसीयु मधील चार रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र चार जणांचा मृत्यू आगीत होरपळून झाला नसून रूग्ण दुसऱ्या रुग्णालयात हलवल्यानंतर झाला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग लागल्यानंतर आग विझवण्याकरिता अग्निशामक विभागाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या रुग्णालयात एकूण 20 रुग्ण दाखल होते तर सहा रुग्ण हे आयसीयूमध्ये दाखल होते. आग लागल्यानंतर सर्व रुग्णांना वेळेत दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलेआहे त्यामुळे कोणीही होरपळून मृत्यू मुखी पावलं नाही. मात्र त्यानंतर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे सदरचे रुग्णालय हे कोविड रुग्णालय नव्हते.

याबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर शिवाजी कड यांनी सांगितले की ,या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे, पोस्टमार्टमद्वारे मृत्यूचे कारण शोधले जाईल. सुरुवातीला आम्हाला माहिती मिळाली होती की हॉस्पिटलमध्ये 12 लोक आहेत पण त्यांची संख्या वेगवेगळी असू शकते. पोलिस तपास केला जाईल. कारवाई केली जाईल अशी माहिती कड यांनी दिली आहे.

फायर ऑडिट कडे दुर्लक्ष

दरम्यान राज्यात आगीच्या घटना वाढत असताना रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट करणे महत्त्वाचे बनले आहे. त्याबाबत प्रत्येक रुग्णालयाला प्रशासनानं निर्देश देखील दिल्याचे समजते आहे. या रुग्णालयाला यापूर्वीदेखील ठाणे अग्निशामक विभागाच्यावतीने फायर ऑडिट ची नोटीस देण्यात आली होती मात्र तरीही याकडे रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.

घटनेबाबतची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिली आहे. घटनास्थळी भेट देऊन त्यांनी तेथील परिस्थितीचा आढावा देखील घेतला. दरम्यान या आगीच्या घटनेत मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींना देखील एक लाख देण्यात येणार असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

Leave a Comment