एसबीआय, श्रीबाग बँकेत 41 लाखांची फसवणूक; 27 जणांवर गुन्हा दाखल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नियमात नसतानाही कर्ज मंजूर करणे, खोटे वेतन पत्रक देणे, असा गैरप्रकार करून अलिबाग शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, श्रीबाग शाखेतील तत्कालीन शाखा व्यवस्थापक, क्षेत्रीय अधिकारी व कर्जदारांनी बँकेची 41लाख 67 हजार 667 रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात 27 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये स्थानिकांसह ठाणे जिल्हा व गुजरात राज्यातील आरोपींचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.
नियमात बसत नसताना कर्जे मंजूर
स्टेट बँक ऑफ इंडिया, श्रीबाग बँकेचे विद्यमान शाखा व्यवस्थापक संतोष यमगेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शैशव नलावडे हे 2 जुलै 2018 ते 24 मे 2021 या कालावधीत श्रीबाग येथील स्टेट बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम पहात होते तर, अमिताभ गुंजन हे क्षेत्रीय अधिकारी म्हणून होते. श्रीबाग एसबीआय शाखेचे ऑडिट 26 मे 2022 रोजी पुणे येथील ऑडिट विभागाकडून झाले होते. त्यामध्ये नलावडे आणि गुंजन या दोघांनी मिळून एक्स्प्रेस क्रेडिट लोन या योजनेअंतर्गत 65 जणांना विविध रकमांचे कर्ज मंजूर केल्याचे दिसून आले होते. लेखा परीक्षणात असे आढळून आले की, कर्जदारांचे कर्ज मंजूर करताना ते कोणत्याही नियमात बसवले गेले नाही. अर्थात नियम डावलून कर्जे दिली गेली होती.
तत्कालीन शाखा व्यवस्थापक व फिल्ड ऑफिसर यांचा सहभाग
खोटे वेतन पत्रक, बँक स्टेटमेंट देऊन त्यांच्याकडूही दिशाभूल करून काही जणांनी वैयक्तिक कर्ज मिळवल्याचे या लेखापरीक्षणात उघड झाले. यातील 38 जणांनी कर्जाची रक्कम पूर्ण भरून त्यांचे कर्जाचे खाते बंद केले. परंतु त्यापैकी 27 जणांनी खोटे दस्तऐवज देऊन बँकेकडून कर्ज मिळविले. यामध्ये 27 जणांची कसलीही पडताळणी न करता कर्ज मंजूर करण्यामध्ये तत्कालीन शाखा व्यवस्थापक नलावडे व फिल्ड व्यवस्थापक गुंजन यांचा सहभाग होता. या दोघांनी संगनमताने बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. हा प्रकार या सर्वांनी 2018 पासून 2021 या कालावधीत केल्याची तक्रार शाखा व्यवस्थापक यमगेकर यांनी केली आहे.
या फसवणूक प्रकरणी श्रीबागमधील स्टेट बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक, फिल्ड ऑफिसर व 27 कर्जदारांविरोधात फसवणूक केल्याबाबत पोलिसांकडून तक्रार नोंदवण्यात आली आहे. कर्जदारांनी कर्जाचा हप्ता न भरल्याने वरिष्ठ पातळीवर याबाबत चौकशी करण्यात आली. यावेळी २८ कर्जदारांनी बनावट कागदपत्र देऊन बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले, असे पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे यांनी सांगितले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणी अजूनही कोणाला ताब्यात घेण्यात आलेले नाही. अलिबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.