औंध दरोडेखोर पलायन प्रकरण : सहायक पोलीस निरीक्षकासह 5 पोलीस निलंबित

पोलीस अधीक्षकांची कारवाई : दरोडेखोर पलायन प्रकरण भोवले

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील औंध पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून तसेच पोलिसांनाच मारहाण करून पाच दरोडेखोर पसार झाल्याची घटना सोमवारी (दि. 5) रोजी घडली होती. या घटनेमुळे जिल्ह्यात पोलीस दलात खळबळ उडाली होती. गृहमंत्री दौऱ्यावर असताना ही घटना घडल्यामुळे पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे निघाले. यावरून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आज कारवाई करीत औंध पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांच्यासह 5 पोलीसांना निलंबित केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी औंध पोलीस ठाण्यातील लॉकअपमधून पाच दरोडेखोर पसार झाले होते. या घटनेनंतर कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह पोलीस अधिकारी औंध येथे दाखल झाले होते. तर दुसरीकडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जिल्हा दौऱ्यावर असताना असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती.

गृहमंत्री वळसे पाटील यांनीही या प्रकरणाची दखल घेत सखोल चौकशी करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी चौकशी करीत या प्रकरणी औंध पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांच्यासह 5 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

प्रशांत बदेंच्या जागी दराडे यांची नियुक्ती

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी औंध पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांच्यासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तर बदे यांच्या जागी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दराडे यांची नियुक्ती केली आहे. यावरून पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांना दरोडेखोर पलायन प्रकरण भोवल्याचे दिसत आहे.