600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार आजपासून संपावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून राज्यातील राज्यातील 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार संपावर आहेत. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते, हा ग्रेड पे मुद्दा घेऊन नायब तहसीलदारांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आजपासून राज्यातील तहसील कार्यालयात शुकशुकाट असण्याची शक्यता आहे.

13 ऑक्टोबर 1998 रोजी राज्य सरकारने नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरुन वाढवून वर्ग दोन केला होता. मात्र वेतनवाढ केली नव्हती. मागील 25 वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात, परंतु त्यांना वेतन मात्र वर्ग तीनचे मिळत आहे. त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा संप पुकारण्यात आला आहे. त्यानुसार 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार आजपासून संपावर आहेत.

तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या संपामुळे जनतेची अनेक कामे खोळंबणार आहेत. या संपामुळे शासकीय यंत्रणा कोलमडणार असून राज्यातील शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांना या संपाचा फटका बसू शकतो. या तिन्ही वर्गातील नागरिकांची अनेक कामे तहसीलदार कार्यालयाच्या अंतगर्त येतात. त्यामुळे या संपामुळे शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि विद्यार्थी भरडला जात आहे हे मात्र नक्की….