औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. पहिल्या दिवशी दोन्ही सत्रात मिळून 66 हजार 441 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेला हजेरी लावल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च-एप्रिल 2021 उन्हाळी परीक्षांचे नियोजन या महिन्याच्या अखेरीस करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच अभ्यासक्रमांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना मोबाईल, संगणक अथवा लॅपटॉप या माध्यमातून पेपर सोडवता येतात. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार 29 जुलैपासून बीए, बीएस्सी बी कॉम या अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा सुरू झाल्यात. विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देताना अडचणी येऊ नये यासाठी 23 ते 28 जुलै या काळात टेस्ट घेण्यात आल्या होत्या. यादरम्यान 87 हजार एकशे आठ विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट दिली होती.
विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास संबंधित महाविद्यालय जबाबदार –
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्वच पेपर हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. अनेक महाविद्यालयातील आयटी समन्वयक विद्यार्थ्यांना सहकार्य करत नसल्याच्या तक्रारी विद्यापीठाला प्राप्त झाल्या आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, याची काळजी संबंधित महाविद्यालयाने घ्यायची आहे विद्यापीठ प्रशासन संबंधित महाविद्यालय व आयटी समन्वयकांना सहकार्य करण्याच्या सूचना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. तसेच परीक्षेच्या काळात महाविद्यालयांनी दोन आयटी समन्वयक नेमून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी सूचना द्याव्यात असे निर्देश विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिले आहेत.