सोलापूरात सात घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार अटकेत, 2 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त

सोलापूर | सोलापूर शहरात घरफोडी करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 2 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी आणि सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात घरफोडी केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

पोलीस उपायुक्त सोलापूर वैशाली कडूकर यांनी दिलेली माहीती अशी, नंदकुमार विजय कोक्कुल (वय- 26 रा. दोन नंबर पाण्याच्या टाकीजवळ, नवीन घरकुल सोलापूर) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवलिंग नगर, राजीव नगर,कल्पना नगर आणि सिद्धरामेश्वर नगर या परिसरात गेल्या काही महिन्यापासून घरफोडीचे गुन्हे वाढले होते.

नंदकुमार कोक्कुल हा विनायक नगर येथील मोकळ्या मैदानात येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून त्याला ताब्यात घेवून विश्वासात घेऊन चौकशी केली असता, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 6 तर सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत 1 अशा एकूण सात घरफोडी केल्याची नंदकुमार कोक्कुल याने कबुली दिली आहे.