तब्बल 740 विद्यार्थ्यांनी 5 मिनिटांत लिहिली भगवद्गीता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड येथील शिक्षण मंडळ संचालित सांस्कृतिक विभागामार्फत प्रतिवर्षी (कै.) अनंत श्रीधर भागवत यांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय भगवद्गीता पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी शताब्दीनिमित्त शिक्षण मंडळाच्या वतीने टिळक हायस्कूलच्या प्रांगणात पाच मिनिटांत हस्तलिखित भगवद्गीता हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संस्थेच्या चार माध्यमिक शाळांतील 740 विद्यार्थ्यांनी 5 मिनिटांत भगवद्गीतेतील 740 श्लोक लिहून जागतिक विक्रम आज केला.

कराडच्या शिक्षण मंडळ या संस्थेने हा अभिनव उपक्रम (कै.) अनंत श्रीधर भागवत यांच्या स्मृतीस समर्पित केलेला होता. अनंत भागवत यांनी सुमारे 70 वर्ष शाळेत भगवद्गीता शिकवली होती. त्यामुळे त्यांच्या स्मृती निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे शिक्षक काही महिने परिश्रम घेत होते. दरम्यान गीता जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन केले होते. शिक्षण मंडळाचे लाहोटी कन्याप्रशाला, टिळक हायस्कूल, एसएमएस इंग्लिश मीडियम आणि ओगलेवाडीच्या आत्माराम विद्यामंदिरच्या ७४० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, उपाध्यक्ष अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, अध्यक्ष डॉ. अनिल हुद्देदार यांच्यासह मान्यवर व पालक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी अशोक अडक या वेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.