Saturday, February 4, 2023

13 वर्षीय शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यू

- Advertisement -

औरंगाबाद | मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भांबर्डा शिवारात घडली. साई कैलास भिसे (वय13) रा.भांबर्डा ता. जिल्हा औरंगाबाद असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

बुधवारी दुपारी आपल्या पाच मित्रांसोबत दुधड येथील लाहुकी नदीवरील सिमेंट बंधारा येथे तो पोहोण्यासाठी गेला होता. पण त्या ठिकाणी खूप जण पोहण्यासाठी आलेले पाहून ते आपल्याला काही बोलतील या भीतीने साई आणि साईचे मित्र तिथून निघून गेले. आणि दुधड शिवारातील डोंगर पायथ्याशी असलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले.

- Advertisement -

साईला पोहता येत नसताना देखील सगळे मित्र पोहण्यासाठी तलावात गेले हे बघून त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही. आणि त्याने तलावात उडी मारली. पाण्याची खोली त्याच्या लक्षात न आल्याने तो पाण्यात बुडाला. साई दिसत नसल्याने मित्रांनी त्याची शोधाशोध सुरू केली. मात्र तो सापडला मग त्यांनी आरडा-ओरड केली असता तलावाजवळ असलेले शेतकऱ्यांनी तलावाकडे धाव घेत साईला पाण्यातून बाहेर काढले. करमाड येथील एका खाजगी रुग्णालयात त्याला दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.