वेण्णा नदीत 13 वर्षीय शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू

सातारा | सातारा शहरातून महामार्गावर जाताना लागणाऱ्या वेण्णा नदीवर पोहण्यासाठी चार मैत्रिणी गेल्या होत्या. मात्र, पोहताना एका सातवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू झाला. कस्तुरी विजय निकम (वय- 13, रा. वर्ये, ता, सातारा) असे बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कस्तुरी निकम आणि तिच्या चार मैत्रिणी वेण्णा नदीच्या निकम आळी डोहात पोहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी कस्तुरी डोहात पोहत असताना अचानक बुडाली. यावेळी तिच्या मैत्रिणी आणि कपडे धुणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केला. तसेच गावातील लोकांना बोलावून आणले. यानंतर काही ग्रामस्थांनी डोहामध्ये उडी मारून कस्तुरीचा शोध घेतला. त्यावेळी ती डोहाच्या तळाला सापडली.

तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे वर्ये परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिचे आई- वडील मोजमजुरी करतात. तिला आणखी एक मोठी बहीण आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.