संभाजीनगरमध्ये 2 गटात राडा, प्रचंड दगडफेक; पोलिसांच्या गाड्याही पेटवल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 गटात राडा झाल्याचे पाहायला मिळालं. काल रात्री 2 वाजता किराडपुरा येथे हा राडा झाला. यावेळी प्रचंड दगडफेक आणि अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असताना जमावाने पोलिसांच्या गाड्याही जाळल्या. अखेर जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला.

माहितीनुसार, संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात ही दंगल झाली. राम मंदिराजवळ तरुणांमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. त्यातून प्रकरण हाणामारी आणि दगडफेकीवर गेलं. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असता जमावाने पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांच्या आणि खासगी मिळून अशा एकूण 13 गाड्या जाळल्या गेल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.

दरम्यान, सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी केले आहे. याप्रकरणी संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कायदा मोडणाऱ्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

संभाजीनगरचे खासदार इम्तियाझ जलील यांनीही हात जोडून शांतता राखण्याचे आव्हान केलं आहे. एकीकडे रमजान महिना सुरू आहे तर दुसरीकडे आज राम नवमी आहे. दोन्ही सण महत्त्वाचे आहेत त्यामुळे कोणीही खोडा घालू नये असं म्हणत जलील यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी कारवाई करावी. तसेच कोम्बिंग ऑपरेशन करून ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.